गणेशोत्सवावर प्रशासनाची नजर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सातारा- उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक असलेला गणेशोत्सव अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवावर अन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळही जलप्रदूषणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रमुख 16 ठिकाणी जलप्रदूषणाच्या निमित्ताने होणारे बदल टिपणार आहे. 

सातारा- उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक असलेला गणेशोत्सव अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवावर अन्न आणि औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळही जलप्रदूषणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रमुख 16 ठिकाणी जलप्रदूषणाच्या निमित्ताने होणारे बदल टिपणार आहे. 

गणेशोत्सवात गोड पदार्थांची रेलचेल असते. गौरी पूजन व जेवणाच्या निमित्ताने बर्फी व अन्य फराळाच्या पदार्थांचा वापर केला जातो. या सणाच्या निमित्ताने अनुचित प्रकार टाळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कंबर कसली आहे. नुकतीच साताऱ्यातील हलवाईंची बैठक घेऊन भेसळयुक्त पदार्थांना प्रतिबंध करण्यासंदर्भात तसेच स्वच्छतेसंदर्भात सूचना केल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी मिठाई व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. खाद्यपदार्थ आस्थापनांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे यांनी सांगितले. 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 16 विसर्जनस्थळांवर लक्ष ठेवणार आहे. या ठिकाणी विसर्जनपूर्व, विसर्जनाच्या काळात आणि विसर्जनानंतरचे पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे पृथःकरण करण्यात येईल. सातारा शहरात मंगळवार तळ्यासह पाच विसर्जनस्थळांचे नमुने घेण्यात येतील. कृष्णा नदीवर वाई, माहुली आणि कऱ्हाड अशा तीन ठिकाणी पाणी तपासले जाणार असल्याचे मंडळाचे प्रांताधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पालिका क्षेत्रांमध्ये मूर्ती विसर्जनासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याबाबतही सूचित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
मिठाई विक्रेत्यांनी बाहेरचा खवा खरेदी करताना त्याचा उत्पादन दिनांक आदी गोष्टी तपासून घ्याव्यात अथवा स्वत: तयार केलेल्या खव्याचाच वापर करावा. 
- एस. बी. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Ganeshotsav

टॅग्स