esakal | ॐकार माहात्म्य व गणेश उत्सव; जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

ganesha festival

ॐकार माहात्म्य व गणेश उत्सव; जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्री गणेश आणि ॐकार यांमधील संबंध घनिष्ट असा आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने ॐकाराविषयीची प्राथमिक माहिती आणि त्याचा गजाननासोबतचा सहसंबंध जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.

- प्राजक्ता सांगवडेकर

ॐ हा अनाहत नाद मानला गेलेला आहे. म्हणजेच कोणत्याही आघाताशिवाय उत्पन्न झालेला नाद! याचे वर्णन जरी सर्वत्र आढळत असले तरी ॐ चा उल्लेख सर्वप्रथम शुक्ल यजुर्वेदात आढळतो. त्याची एक अशी व्याख्या नसून, भगवान श्रीकृष्ण ॐकाराला ‘एकाक्षर परब्रह्म’ म्हणतात, तर शीख धर्मीयांमध्येदेखील ‘एक ॐकार सतनाम’ अशी प्रार्थना आहे, जिचा अर्थ एक ॐकार - एकच परब्रह्म आहे! पतंजली मुनींनी आपल्या योगसूत्रांमध्ये ॐकाराविषयी म्हटले आहे, तस्य वाचकः प्रणवः ।।१-२७।। यानुसार ॐकार हे ईश्‍वराचे प्रतीक आहे. ईश्‍वराचे ध्वनिरूप म्हणजे ॐकार! अशा या ॐकाराला फक्त हिंदू धर्मातच नव्हे, तर इतर धर्मांतही महत्त्वाचे स्थान आहे. ॐ हा अनेक प्रकारे लिहिला जातो. उभा, आडवा. याचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर ज्ञानेश्‍वर माउलींनी ज्ञानेश्‍वरीमध्ये याचे वर्णन केले आहे. ‘जया ॐकाराचिये कुशी। अक्षरे होती अ उ म कारेसी ।।९-२७६।। अ उ म ही तीन अक्षरे आणि अर्धचंद्र व अनुस्वार मिळून ॐ हा साडेतीन मात्रांचा बनलेला असतो. हे याचे बाह्यरूप झाले. अशा या ॐकाराच्या जपाचे महत्त्व खूप सांगितले आहे. हा जप करण्यासाठीचे सर्वसामान्य नियम । विधिनिषेध आपण बघूया.

जप सुरू करण्यापूर्वी साधकाने ७ गोष्टी ध्यानात घ्याव्यात

स्थळ (जागा) - स्वच्छ, हवेशीर, सपाट असावी.

आसन - सुती बस्कर, आरामदायी असावे. एकच आसन वापरावे.

परिसर - प्रदूषणमुक्त, गोंगाटविरहित, शांत.

देह (शरीर) - स्वच्छ आंघोळ करून, रोगमुक्त, पोट रिकामे असावे.

देहांतर्गत अवस्था - मन शांत असावे. शारीरिक दुखणे नसावे.

उच्चार - स्पष्ट, दीर्घ, अभ्यासपूर्ण.

वेळ - शक्यतो पहाटे किंवा रात्री झोपण्यापूर्वी करावा.

यापुढे आपण बघू, की याचे उच्चारण कसे आणि किती वेळ करावे. ॐ च्या उच्चारणापूर्वी १) कोणत्याही ध्यानात्मक आसनात किंवा सुखासनात स्थिर बसावे. २) पाठीचा कणा ताठ, खांदे ढिले करावे. ३) डोळे अलगद मिटून घ्यावे. ४) संपूर्ण शरीरावरील अतिरिक्त ताण काढून टाकावा. ५) दीर्घ श्‍वास घ्यावा आणि मग कंठातून सर्वप्रथम अऽऽऽ चे उच्चारण करावे. हे करताना ओठ एकमेकापासून हलकेच विलग करावेत, त्यानंतर ओठांचा चंबू करावा म्हणजे उऽऽऽचे उच्चारण सुरू होते आणि पुढे हलकेच ओठ मिटून घ्यावेत, त्यामुळे मऽऽऽ कार सुरू होतो. याचे प्रमाण बघायचे झाल्यास समजा दहा सेकंदांचा एक ॐकार म्हणणार असू तर ‘अ’कार २ सेकंद, ‘उ’कार ३ सेकंद व ‘म’कार ५ सेकंद म्हणावा. ‘म’कार जितका अधिक वेळ लांबवणार तितके फायदे जास्त मिळतात. यासाठी दीर्घ श्‍वसनाचा सराव भरपूर करावा. सुरुवातीला हा जप ११ आवर्तने, मग २१, ५१ अशी वाढवत नेऊन नंतर रोज किमान १५ मिनिटांपासून अर्धा तास रोज करावा. रोजच्या ॐकार जपामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे आहारात उष्णता कमी करणारे घटक वाढवावेत. अशा या ॐकार जपाचे फायदे काय आहेत? तर याचे फायदे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर जाणवतात.

ॐकार जपाचे फायदे

अ) शारीरिक परिणाम :

याच्या कंपनांमुळे Pituitary gland (पियूष ग्रंथी)ला उत्तेजना मिळून संपूर्ण शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. पर्यायाने Thyroid, Sugar, भावनांचे चढउतार, पाळीचे विकार या सर्वांमध्ये संतुलन येत जाते. हृदय, मेंदू अशा महत्त्‍वाच्या अवयवांचे काम सुधारते.

ब) मानसिक :

मन शांत होते. अर्ध्या तासाच्या जपानंतर आंतरिक आनंदाची आणि शांततेची वेगळीच अनुभूती प्रत्येक साधकाला येते. मनोकायिक आजार जसे की Phobia, Anxiety, Depression हे कमी व्हायला मदत होते. मानसिक ताण कमी होतो.

क) आध्यात्मिक :

साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त होते. विषयावरचे मन अधिकाधिक अंतिम सत्याच्या शोधाकडे आकृष्ट होते. लांबचे नाद ऐकू येऊ लागतात. जपादरम्यान घंटानाद, तंबोऱ्याचा नाद ऐकू येतो. नादसमाधी लागते.

याहून देखील अधिक असे बरेच फायदे ॐकार जपाचे आहेत. तर अशा या ॐचा आणि गणपतीचा संबंध बघायला गेलो तर ज्ञानेश्‍वर माउलींनी ॐकारातील गणेशवंदन ज्ञानेश्‍वरीमध्ये लिहून ठेवलेले आहे.

अ कार चरण युगुल ।

उ कार उदर विशाल ।

म कार महामंडल ।

मस्तकाकारे ।।

श्री गणेशाचे बीजरूप म्हणजे ॐ आहे. ॐ च्या साडेतीन मात्रांचा संबंध कुंडलिनीच्या साडेतीन वेटोळे घातलेल्या नागाच्या पिलाशी जोडलेला आहे. ही कुंडलिनी मूलाधार चक्राशी स्थित असते, ज्याची देवता श्री गणपती आहे.

ॐ ला गजाननाचे रूपच मानतात. नेहमी लिहिला जाणारा ॐ उभा लिहिला तर त्याची सत्यता लक्षात येते. या ॐ चा वरील भाग म्हणजे गणेशाचे गंडस्थळ, खालची सोंड, शेजारी तुटलेला दात आणि बिंदू म्हणजे सूक्ष्म ज्ञाननेत्र. अशाप्रकारे ॐ हा गणेशस्वरूप आहे. तर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ॐकार जप सुरू करायला हरकत नाही. कारण फक्त वाचून, माहिती घेऊन अनुभूती येत नाही. निदान गणपतीच्या दहा दिवसांत एक नवीन प्रयोग म्हणून तरी ही उपासना सर्वांनी करून पाहावी आणि स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवावे!

(लेखिका : कोल्हापूर येथील विश्‍ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि योगोपचार केंद्र येथे योग उपचारक आहेत.)

loading image
go to top