रेडीचा व्दिभूजा गणपती

Redicha dvibhuja Ganpati
Redicha dvibhuja Ganpati

रेडी येथील व्दिभूज गणपती देवस्थान आता सिंधुदुर्गातील प्रमूख धार्मिक पर्यटनस्थळांपैकी एक बनले आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती उत्खननात सापडली आहे. या देवस्थानला मानणार्‍या भाविकांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. या मंदिराविषयी...

रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील देखणे गाव. माडा, पोफळींच्या बागा, निळाशार समुद्र किनारा आणि प्राचीन मंदिरांमुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. यशवंत गडाच्या रूपाने या गावाला ऐतिहासीक वारसाही लाभला आहे.

रेडी विषयी एक आख्यायीका प्रसिध्द आहे. या गावचे पूर्वीचे नाव रेवतीव्दिप, रेवतीपट्टण किंवा रेवतीनगर असे होते. तेराव्या शतकात सलेश्‍वर राजाची ही राजधानी होती. या काळात नागपंथी सांप्रदायाचा प्रसात सुरू झाला. या सांप्रदायातील सिध्दपूरूषांच्या सिध्द विद्येने राजा सत्तेश्‍वर भयभीत झाला. यातून संघर्ष होवून रेवतीनगर लयाला गेले अशी अख्ख्यायीका सांगितली जाते.

येथे प्राचीन काळापासून श्री देवी माऊली (आदीमाया) हे स्वयंभू रामदैवत आहे. या शिवाय इतरही मंदिरे आहेत. व्दिभूजा गणपतीचे मंदिर मात्र अलिकडच्या काळातील आहे.

साधारण 50-60 वर्षांपासून येथे खाण व्यवसाय सुरू आहे. या काळात खाणीवरून खनीजमालाची ट्रकमधून ने-आण चालायची. रेडी-नागोळावाडी येथील सदानंद नागेश कांबळी हे एप्रिल 1976 मध्ये ट्रकमधून खणीजमाल नेत होते. आता मंदिर असलेल्या परिसरात आले असता त्यांना झोप आली. यावेळी गणपती त्यांच्या स्वप्नात आला व आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला. कांबळी यांनी ग्रामस्थांना ही बाब सांगितली. यानंतर ग्रामदैवताला कौल लावून खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी गणपतीची जांभा दगडात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली. यानंतर महिन्याभरांनी गणपतीचे वाहन असलेल्या उंदराचीही मूर्ती सापडली.

अखंड जांभा दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच आणि साधारण तीन फूट रूंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. मूर्तीचा एक हात आशिर्वाद देत असून दुसर्‍या हातात मोदक आहे. उंदीरही मोठा आहे. नंतरच्या काळात या मूर्तीचे सुशोभिकरण करण्यात आले. या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापणा करून 1978 मध्ये मंदिर बांधण्यात आले. अलिकडे या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला.

हे मंदिर सिंधुदुर्गाच्या धार्मिक पर्यटन क्षेत्रातील प्रमुख स्थळ बनले आहे. या ठिकाणी एप्रिलमध्ये मंदिराचा वर्धापनदिन तसेच माघी गणेश जयंती, अनंत चतुर्दशी, अंगारकी आदी कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात साजरे होता. देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com