युएई व भारतात "व्यूहात्मक तेलसाठ्या'चा करार

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

भारताच्या विकास कार्यक्रमामध्ये संयुक्‍त अरब अमिरातीचा सहभाग आम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानतो. भारतामधील पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात संयुक्‍त अरब अमिरातीने दाखविलेल्या उत्सुकतेचे मी विशेषत्वाने स्वागत करतो

नवी दिल्ली - भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली.

संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नहयान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराजांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. दोन देशांमध्ये एकूण 14 करार करण्यात आले असून द्विपक्षीय संबंधांचे रुपांतर आता "व्यूहात्मक भागीदारी'मध्ये करण्यात आले आहे.

भारताने 2014 मध्ये अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपनीशी व्यूहात्मक तेल साठ्याची बांधणी करण्यासंदर्भातील चर्चा सुरु केली होती. या करारानुसार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये या तेलसाठ्यावर भारताचा प्रथम अधिकार असेल. यानंतर संयुक्त अरब अमिरातीस येथून मागणीनुसार तेलपुरवठा करता येईल.

भारताचे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपनीच्या प्रतिनिधींनी यासंदर्भातील करारावर औपचारिक स्वाक्षरी केली. भारताच्या इंधन सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून संयुक्‍त अरब अमिरातीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतास 2015-16 या वर्षात सर्वाधिक तेल पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये संयुक्‍त अरब अमिरातीचे स्थान पाचवे होते. भारताच्या एकंदर परराष्ट्र धोरणामध्ये या देशाचे स्थान अत्यंत संवेदनशील मानले जाते.

""भारताच्या विकास कार्यक्रमामध्ये संयुक्‍त अरब अमिरातीचा सहभाग आम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानतो. भारतामधील पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात संयुक्‍त अरब अमिरातीने दाखविलेल्या उत्सुकतेचे मी विशेषत्वाने स्वागत करतो. डिजिटल अर्थव्यवस्था, कुशल मनुष्यबळ आणि स्मार्ट शहरीकरणाच्या उद्देशार्थ आम्ही हाती घेतलेल्या योजनांमध्ये अंतर्भाव असलेल्या अनेक संधींच्या पूर्तीसाठी दोन देश एकत्रित काम करु शकतात,'' असे प्रतिपादन भारतीय पंतप्रधानांनी यावेळी केले.

याचबरोबर मोदी यांनी संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जागा दिल्याबद्दलही युवराजांचे आभार मानले.

Web Title: India signs pact with UAE to build strategic oil reserves