"प्लेबॉय' पुन्हा देणार नग्नतेस स्थान...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मासिकामधून नग्नता पूर्णपणे हटविणे ही चूक होती. आज आम्ही आमची ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत...

न्यूयॉर्क - "प्लेबॉय' या जगप्रसिद्ध मासिकाने गेल्या वर्षी घेतलेला धोरणात्मक निर्णय मागे घेत या मासिकामध्ये पुन्हा एकदा नग्नतेस स्थान देण्याची घोषणा केली आहे. प्लेबॉयचे नवे मुख्य रचनात्मक (क्रिएटिव्ह) अधिकारी कूपर हेफनर यांनी ही घोषणा केली आहे. मासिकामधून नग्नता पूर्णपणे हटविणे ही चूक होती, अशी स्पष्टोक्ती हेफनर यांनी केली आहे. ""आज आम्ही आमची ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत,'' अशा आशयाचे ट्‌विटही त्यांनी केली आहे.

दरम्यान, मासिकाच्या या निर्णयाचे सोशल मिडियावर संमिश्र स्वागत झाले आहे. काही जणांनी या निर्णयाची मनमोकळी प्रशंसा केली आहे; तर नग्नतेस स्थान न देण्याच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होत असल्यानेच हा "यु टर्न' घेण्यात आला असल्याची टीकाही काही जणांनी केली आहे. नग्नतेच्या या नव्या धोरणाबरोबरच मासिकाच्या पुढच्या महिन्यामधील अंकामध्ये "फ्री दी निपल्स' मोहिमेसंदर्भात अभिनेत्री स्कार्लेट बायरन हिचा लेखही समाविष्ट केला जाणार आहे.

1953 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मासिकाचा खप 1970 च्या दशकांत 50 लाखांहूनही अधिक होता. मात्र इंटरनेटच्या उदयानंतर या मासिकाचा खप घसरण्यास सुरुवात झाली होती. इंटरनेटमुळे नग्नतेचे विक्रीमूल्य कमी झाल्याचे मुख्य कारण यामागे असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी या मासिकाचा खप सुमारे 7 लाख असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्‍वभूमीवर, पुन्हा एकदा नग्नतेचा आधार घेण्याचा मासिकाचा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

Web Title: Playboy brings back nudity