कान्समध्ये झळकला पुण्यातील पायलचा लघुपट

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

भारतीय महिला प्रेमाबद्दल शक्‍यतो उघडपणे बोलत नाहीत. या लघुपटाद्वारे मला हेच प्रेक्षकासमोर मांडायचे होते. प्रसिद्ध चित्रकार अर्पिता सिंह यांच्या कामातून मला "आफ्टरनून क्‍लाउड्‌स'साठी प्रेरणा मिळाली.
- पायल कपाडिया

कान्स : कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोन, ऐश्वर्या राय यांनी कोणता पेहराव केला, याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले असतानाच पुण्यातील "एफटीआय'ची विद्यार्थिनी पायल कपाडिया हिच्या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारली. तिचा "आफ्टरनून क्‍लाऊड्‌स' हा लघुपट यंदा कान्समध्ये झळकलेला एकमेव भारतीय चित्रपट ठरला.

विद्यार्थी चित्रपट निर्मात्यांनी तयार केलेल्या चित्रपटांसाठी कान्समध्ये असलेल्या सिनेफॉन्डेशन श्रेणी प्रकारात पायलच्या लघुपटाला प्रथम स्थान मिळाले. हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला. यंदा सिनेफॉन्डेशन सेक्‍शनमध्ये जगभरातील 16 लघुपट दाखल झाले होते. त्यापैकी पायलच्या लघुपटाला सर्वांधिक पसंती मिळाली. भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघुपट कान्समध्ये झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पायल कपाडिया ही मूळ मुंबईतील गुजराती कुटुंबातील मुलगी. ती सध्या पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. द्वितीय वर्षास असताना पायलने "लास्ट मॅंगो बिफोर द मॉन्सून' हा लघुपट बनविला होता. या लघुपटास जर्मनीतील ओबेरहाउसेन लघुपट महोत्सवात समीक्षकांचा पुरस्कार मिळाला होता.

पायलच्या लघुपटाविषयी
"आफ्टरनून क्‍लाउड्‌स' हा 13 मिनिटांचा लघुपट असून, त्यात उषा नाईक व त्रिमाला अधिकारी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मध्यमवयीन विधवा व तरुण मोलकरीण यांच्या आयुष्यातील प्रेम व एकाकीपणा या लघुपटाद्वारे मांडण्यात आला आहे.

Web Title: pune news payal kapadia short film at cannes film festival