11 नातेवाईकांनी केली आपसांत लग्नं आणि घेतले 23 वेळा घटस्फोट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सरकारी योजनांतून मोफत घर मिळवण्यासाठी लढवली युक्ती

झेजियांग : सरकारी योजनांतून मोफत किंवा कमी किंमतीत घर मिळवण्यासाठी अनेकजण विविध क्लुप्त्या लढवताना दिसून येतात. यात खोटे पुरावे सादर करणे, 
स्थलांतरण हे सगळे होतच असते. मात्र चीनमधील एका लबाड कुटूंबातील 11 व्यक्तींनी तर चक्क एकमेकांसह 23 वेळा लग्न करत सरकारी योजनेतून घर मिळवले आहे.  

चीनच्या झेजियांग प्रातांत विकास प्रकल्पाअंतर्गत तेथील रहिवाशांना नवीन घरे देण्यात येणार होती. यासाठी एकाच कुटुंबातील 11 नातेवाईकांनी सरकारच्या या घरवाटप योजनेचा लाभ घेण्याकरिता, एका महिन्यात आपसांत लग्न करून तब्बल 23 वेळा घटस्फोट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित कुटुंबातील 11 नातेवाईकांनी एका महिन्यात एकमेकांशी लग्न करून 23 वेळा घटस्फोट घेतला. याची सुरुवात पॅन नामक व्यक्तीने केली.

त्याने सर्वात आधी आपल्या घटस्फोट घेतलेल्या पत्नीशी पुन्हा लग्न केले. त्यांना एक घर मिळताच लगेचच सहा दिवसांत त्यांनी घटस्फोट घेतला. असे करत पॅन याच्या परिवारातील पुतणे, भाचे, भाऊ, बहिण, मेहुणी अशा 11 जणांनी पुढील महिनाभरात आपापसांत 23 वेळा लग्न करत घटस्फोट घेतला. ही माहिती पोलिसांना समजताच सर्व प्रकार चव्हाट्यावर आला. दरम्यान, सध्या पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 relatives married and divorced 23 times