पाकिस्तानमध्ये तेल टँकरचा अपघात; किमान १२३ मृत्युमुखी

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

गावकऱ्यांनी त्वरित टॅंकरमधून गळणारे तेल मोठ्‌या कॅनमधून गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु आग भडकल्यामुळे अनेक नागरिक अक्षरश: जळून ठार झाले. या अपघातामध्ये सहा मोठ्या गाड्या व 12 दुचाकी वाहनांचीही जळून राख झाली

लाहोर - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यामधील महामार्गावर एक तेलाचा टॅंकर अपघातग्रस्त झाल्यामुळे भडकलेल्या आगीमध्ये किमान 123 नागरिक मृत्युमुखी पडले; तर 100 पेक्षाही अधिक जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या टॅंकरमधून गळत असलेले तेल घेण्यासाठी येथे नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळीच अचानक आग भडकल्याने मोठी प्राणहानी झाली.

हा टॅंकर लाहोर येथून कराची येथे जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. येथील गावकऱ्यांनी त्वरित टॅंकरमधून गळणारे तेल मोठ्‌या कॅनमधून गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु आग भडकल्यामुळे अनेक नागरिक अक्षरश: जळून ठार झाले. या अपघातामध्ये सहा मोठ्या गाड्या व 12 दुचाकी वाहनांचीही जळून राख झाली.

जखमींना येथील जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी राबवित येणाऱ्या मदतकार्यास लष्कराकडूनही सहाय्य करण्यात येत आहे. या घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून येथील राज्य सरकारला देण्यात आले आहे.

Web Title: 123 killed, 100 injured as oil tanker explodes in Pakistan