बांगलादेशातील हिंसाचारात 17 ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

ढाका : बांगलादेशातील आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी हिंसाचारात 17 जण मृत्युमुखी पडले असून, त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी परस्परांवर आरोप केले आहेत. सत्ताधारी अवामी लीग आणि विरोधातील बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी यांच्यात मुख्य लढत आहे. 

ढाका : बांगलादेशातील आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी हिंसाचारात 17 जण मृत्युमुखी पडले असून, त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी परस्परांवर आरोप केले आहेत. सत्ताधारी अवामी लीग आणि विरोधातील बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी यांच्यात मुख्य लढत आहे. 

ढाक्‍यात सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली. विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांनी ढाक्‍यात मतदानाचा हक्क बजावला. ढाक्‍यातून हसिना यांचे पुतने शेख फजलेनूर तपोश हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ""बांगलादेशातील नागरिकांना चांगले भविष्य हवे असून, त्यासाठी ते आमच्या पक्षालाच विजयी करतील, अशी मला आशा आहे,'' अशी प्रतिक्रिया शेख हसिना यांनी व्यक्त केली. बांगलादेशच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा विराजमान होण्यासाठी हसिना या प्रयत्नशील आहेत.

हसिना यांच्या मुख्य विरोधक, माजी पंतप्रधान खालिदा झिया या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. परिणामी, हसिना या विजयाच्या मुख्य दावेदार मानल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात झालेला राजकीय हिंसाचार, प्रसार माध्यमे आणि विरोधी पक्षातील नेत्यांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप सत्ताधारी अवामी लीगवर केला जात आहे. आज झालेल्या मतदाना वेळी दोन्ही हिंसाचारात 17 जण मृत्यमुखी पडले असून, त्यात दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आणि नेत्यांचा समावेश आहे. 

वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद 

सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील सर्वाधिक लोकप्रिय खासगी वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद ठेवण्यात आले होते. जमुना उद्योग समूह हा बांगलादेशातील सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपेकी एक आहे.

या समूहाच्या मालकीच्या जमुना टीव्हीचे प्रक्षेपण दाखविणे केबल ऑपरेटर्सकडून बंद करण्यात आल्याचा आरोप या वाहिनीकडून करण्यात आला आहे. मात्र, संबंधित वाहिनीचे सिग्नल्स प्राप्त होत नसल्याचा दावा केबल ऑपरेटर्सकडून करण्यात आला आहे. जमुना समूहाची वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र आहे. हा समूह निष्पक्ष वार्तांकनासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर हायस्पीड इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 killed in Bangladesh violence