"अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदूंची भूमिका महत्वाची"

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये 2 लाख हिंदू मतदारांची भूमिका महत्वाची असणार आहे. काही राज्यांमध्ये त्यांची मतं निर्णायकी ठरतील, असं वक्तव्य अमेरिकेतील काँग्रेसचे सदस्य आणि भारतीय-अमेरिकी राजा कृष्णमूर्ती यांनी केलंय. मताधिकार वापरून आपला धर्म पाळा, असं कृष्णमूर्ती यांनी हिंदू समुदायाला संबोधित करताना म्हटलं. ते 'हिंदू अमेरिकन फॉर बायडेन' या मोहिमेच्या आभासी उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

जम्बो कोविड सेंटरने भूक-भूक करून मारले हो...

राजा कृष्णमूर्ती तीन वेळा डेमोक्रॅटिक पक्षाकडून इलिनॉय प्रातांतून काँग्रेस सदस्य राहिले आहेत. त्यांनी हिंदू समाजाला संबोधित करताना डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन आणि त्यांच्या सहयोगी कमला हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन केले. अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहे. 

हिंदू मूल्य जपण्यासाठी जो बायडेन यांची निवड होणे मला महत्वाचे वाटते. 'वसुधेव कुटुंबकम' (सर्व जग हेच कुटुंब आहे) अशी सर्व हिंदूची मान्यता आहे. सर्वांना सन्मानाने आणि आदराने वागवण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. याच मुल्यांची जपवणूक करण्यासाठी बायडेन हे राष्ट्रपतीपदी निवडले जाणे आवश्यक आहे, असं कृष्णमूर्ती म्हणाले. 

आपल्यासमोर सर्वात महत्वाच्या निवडणुका वाढून ठेवल्या आहेत. येत्या 60 दिवसात, म्हणजे 3 नोव्हेंबर रोजी, विश्वास ठेवा किंवा न ठेवा, अमेरिकेतील 20 लाख हिंदू अमेरिकी नागरिक निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत. अनेक स्विंग स्टेटमध्ये हिंदूंचे मतदान निर्णायकी ठरेल. केवळ फ्लोरिडाच नाही तर, वर्जेनिया, पेनेसेल्वेनिया, मिशिगन, विस्काँसिन ही यादी अशीच वाढत जाईल. त्यामुळे हे आपले कर्तव्य आहे किंबहूना आपला धर्म आहे की मतदान करायला हवे, असं कृष्णमूर्ती भारतीयांना संबोधित करताना म्हणाले आहेत. 

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज : लष्कर प्रमुख

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ आल्याने अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बायडेन तर रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी आहे. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिघडली आहे. दुसरीकडे आर्थिक पातळीवरही देशाची घसरण झाली आहे. दोन्ही उमेदवार प्रत्येक मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच पाश्वभूमीवर ट्रम्प आणि बायडेन यांनी हिंदू मतांसाठी मोहिम सुरु केली आहे. बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडून यात आघाडी घेतली आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 Million Hindus Key Voting Bloc In us election