VIDEO: लंडनमध्ये अग्नितांडव; किमान सहा मृत्युमुखी

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

रहिवाशी भागात ही आग लागल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आग लागलेली ग्रीनफेल टॉवर ही इमारत 1974 मध्ये उभारण्यात आली होती.

लंडन - पश्चिम लंडनमधील ग्रीनफेल टॉवर या 27 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये सहा नागरिक मृत्युमुखी पडल्याचे निश्‍चित झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या आगीमुळे अक्षरश: हादरून गेल्याची प्रतिक्रिया लंडने महापौर सादिक खान यांनी व्यक्त केली आहे. या आगीत अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 40 गाड्या आणि 200 जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

या इमारतीत एकूण 120 फ्लॅट असून, जवळपास सर्व इमारत जळून खाक झाली आहे. दुसऱ्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. स्थानिक वेळेनुसार आज (बुधवार) पहाटे दीडच्या सुमारास इमारतीला आग लागली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आग अटोक्यात आली नसून, अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 

आग वाढतच चालली असून, ही आग इतकी मोठी आहे की आगीमुळे इमारत कलल्याची माहिती मिळत आहे. रहिवाशी भागात ही आग लागल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आग लागलेली ग्रीनफेल टॉवर ही इमारत 1974 मध्ये उभारण्यात आली होती.

Web Title: 200 Firefighters Battle Massive Blaze At London High-Rise

टॅग्स