लीबियातील २.५ टन युरेनियम गहाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uranium

युद्धग्रस्त लीबियामधून अडीच टन नैसर्गिक युरेनियम गहाळ झाले असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांनी आज जाहीर केले.

Uranium : लीबियातील २.५ टन युरेनियम गहाळ

त्रिपोली - युद्धग्रस्त लीबियामधून अडीच टन नैसर्गिक युरेनियम गहाळ झाले असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांनी आज जाहीर केले. अण्वस्त्रे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचा इतका मोठा साठा गहाळ झाल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. लीबियातील सरकार समर्थक सशस्त्र गटांनी मात्र हा साठा सापडला असून तो सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

अणु ऊर्जा संस्थेचे अध्यक्ष राफेल ग्रॉसी यांनी विविध देशांना लीबियातून गहाळ झालेल्या युरेनियमबाबत माहिती देत सावध राहण्यास सांगितले आहे. लीबियामध्ये युरेनियमचा साठा असलेल्या ठिकाणी नैसर्गिक स्वरुपात साठवून ठेवलेल्या युरेनियमचे दहा ड्रम बेपत्ता झाले आहेत. या ड्रममध्ये जवळपास अडीच टन युरेनियम आहे, असे निवेदन ग्रॉसी यांनी प्रसिद्ध केले आहे. या निवेदनाशिवाय अणुऊर्जा संस्थेने इतर कोणतीही माहिती जाहीर केली नसून कोणत्याही प्रश्‍नांना उत्तर देणे टाळले आहे. लीबियातील कोणत्या ठिकाणाहून साठा गायब गहाळ झाला, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या ठिकाणावर लीबिया सरकारचे नियंत्रण नसल्याचे समजते.

युरेनियमचा साठा असलेली लीबियातील काही ठिकाणे अणुऊर्जा संस्थेने जाहीर केलेली असून त्यापैकी साभा या ठिकाणी मोठा साठा आहे. सहारा वाळवंटात असलेल्या या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव आहे. एकेकाळी लीबियाचे तत्कालीन हुकुमशहा मुअम्मर गडाफी यांनी येथे हजारो बॅरेल युरेनियम साठवून ठेवले होते. अमेरिकेने इराकवर २००३ मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर गडाफी यांनी एक हजार दशलक्ष टन युरेनियमचा साठा केला होता आणि त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प त्यांना उभा करायचा होता, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, २०११ मध्ये बंड होऊन गडाफी यांची हत्या झाली.

रुपांतर प्रक्रिया अवघड

लीबियामधून अडीच टन युरेनियम बेपत्ता झाले असले तरी ते नैसर्गिक स्वरुपातील असल्याने त्याचा ऊर्जा निर्मिती किंवा बाँबनिर्मितीसाठी वापर शक्य नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. युरेनियम समृद्धीकरण करण्यासाठी त्याचे रुपांतर आधी वायूमध्ये करणे आवश्‍यक आहे. नंतर अधिक प्रक्रिया करून वापरयोग्य स्वरुपात त्याचे रुपांतर केले जाते. त्यामुळे सध्या धोका नसला तरी हा गहाळ झालेला साठा तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत असलेल्या हिंसक गटाच्या किंवा देशाच्या हाती लागल्यास ते यातून शस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकेल असे ५.६ किलो युरेनियम निर्माण करू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :global news