आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोर दहशतवादाचे आव्हान

पीटीआय
सोमवार, 6 मार्च 2017

जगभरात दहशतवादाचे प्रमाण सहा टक्‍क्‍यांनी वाढले असून, इसिस, बोको हराम, तालिबान आणि अल कायदा या चार प्रमुख दहशतवादी संघटनांकडून 74 टक्के दहशतवाद पसरविला जात आहे, अशी माहितीही पर्रीकर यांनी या वेळी दिली

नवी दिल्ली - "दहशतवाद हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोरील मोठे आव्हान असून, त्याला तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावर एकमेकांना सहकार्य वाढविणे आवश्‍यक आहे,' असे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज व्यक्त केले. 19 व्या आशियाई सुरक्षा परिषदेमध्ये ते बोलत होते.

पर्रीकर म्हणाले, ""गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि अफगाणिस्तान हे छुप्या युद्धाला बळी पडत आहेत. दहशतवाद हा सर्व जगासमोरील धोका आहे, त्यामुळे शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्याने काम केले पाहिजे. दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत बंद करायला हवेत. दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची आणि त्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याचे आवाहन भारत सातत्याने करत राहील.''

जगभरात दहशतवादाचे प्रमाण सहा टक्‍क्‍यांनी वाढले असून, इसिस, बोको हराम, तालिबान आणि अल कायदा या चार प्रमुख दहशतवादी संघटनांकडून 74 टक्के दहशतवाद पसरविला जात आहे, अशी माहितीही पर्रीकर यांनी या वेळी दिली. इसिसने आपले अस्तित्व 29 देशांमध्ये निर्माण केले असून, यामुळे सहा कोटी नागरिकांना फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महंमद हनिफ अतमार हेदेखील या वेळी उपस्थित होते. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली.