व्हिसा नियम भंगप्रकरणी ब्रिटनमध्ये 38 भारतीयांना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

ब्रिटनमधील लेस्टर येथील कापडनिर्मितीच्या दोन कारखान्यांवर येथील अधिकाऱ्यांनी छापा टाकत 38 भारतीयांना आणि अफगाणिस्तानच्या एकास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

लंडन - ब्रिटनमधील दोन कारखान्यांवर घातलेल्या छाप्यामध्ये व्हिसा नियमांचा भंग केल्याप्रकरणी 38 भारतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी नऊ महिला आहेत.

ब्रिटनमधील लेस्टर येथील कापडनिर्मितीच्या दोन कारखान्यांवर येथील अधिकाऱ्यांनी छापा टाकत 38 भारतीयांना आणि अफगाणिस्तानच्या एकास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 38 भारतीयांपैकी 31 जणांच्या व्हिसाची मुदत संपली होती, तर सात जणांनी ब्रिटनमध्ये बेकायदा प्रवेश मिळविला होता.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 18 जणांना ताब्यात ठेवून त्यांना देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर उर्वरित 20 जणांना दररोज येथील कार्यालयामध्ये हजेरी लावून जाण्यास सांगण्यात आले आहे. या कामगारांना कामावर ठेवल्याबद्दल दोन्ही कारखान्यांना प्रतिकामगार वीस हजार पौंड दंड होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: 38 Indians detained in UK for visa breach