सिक्कीममधील रस्तेनिर्मिती योग्यच

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

चीनचा आडमुठेपणा; भारताला चुका सुधारण्याचा सल्ला

बीजिंग: चीनने सिक्कीम सेक्‍टरमधील रस्तेनिर्मिती योग्यच असल्याचा दावा करताना, 1890 मध्ये झालेल्या चीन-ब्रिटन करारानुसार हा भाग आमच्याच हद्दीत येतो यामध्ये शंकाच नाही, असे म्हटले आहे. भारताने त्यांच्या चुका सुधारल्या, तरच भविष्यात त्यांच्या भाविकांना नाथुला मार्गाद्वारे कैलास मानसरोवरला जाऊ दिले जाईल, असा इशाराही चीनने दिला.

चीनचा आडमुठेपणा; भारताला चुका सुधारण्याचा सल्ला

बीजिंग: चीनने सिक्कीम सेक्‍टरमधील रस्तेनिर्मिती योग्यच असल्याचा दावा करताना, 1890 मध्ये झालेल्या चीन-ब्रिटन करारानुसार हा भाग आमच्याच हद्दीत येतो यामध्ये शंकाच नाही, असे म्हटले आहे. भारताने त्यांच्या चुका सुधारल्या, तरच भविष्यात त्यांच्या भाविकांना नाथुला मार्गाद्वारे कैलास मानसरोवरला जाऊ दिले जाईल, असा इशाराही चीनने दिला.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता ल्यू कांग यांनी आज येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, की सिक्कीमचे प्राचीन नाव "झी' होते. भारतीय लष्कराने ज्या भागावर आक्षेप घेतला आहे, तो ब्रिटनबरोबरील करारानुसार चीनच्या सीमाभागात आहे यामध्ये शंकाच नाही. भारतीय लष्कराने रस्तेनिर्मितीला अडथळा आणल्याच्या चिनी लष्कराच्या आरोपानंतर चीनने भारत-चीन सीमेवरील सिक्कीमचा भाग आपल्या देशाचा अविभाज्य भाग असल्याचा दावा केला.

सिक्कीम भागातील रस्तेनिर्मितीच्या कामात भारत आणि भूतानसह कोणताही देश हस्तक्षेप करू शकत नाही. सिक्कीम सेक्‍टरमधील डोंगलॅंग भागातील रस्तेबांधणीला भारत भूताच्या वतीने आक्षेप घेत आहे आणि भूतानचे चीनशी कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. प्राचीन काळापासून डोंगलॅंग हा भूतानचा नव्हे; तर चीनचा भाग आहे, यामध्ये कोणतीच शंका नाही.

हा मुद्दा उपस्थित करण्याची भारताची इच्छा आहे. मात्र, हा भाग भारताचाही नाही आणि भूतानचाही नाही. त्यामुळे यासाठीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केल्याचे ल्यू कांग यांनी स्पष्ट केले.

दहशतवादाच्या मुद्यावर पाकची पाठराखण
अमेरिका आणि भारताने पाकिस्तानला सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्याचा सल्ला दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी "इस्लामाबादचा मित्र' म्हणवणाऱ्या चीनने पाकिस्तानची जोरदार पाठराखण केली. जागतिक दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान अग्रभागी असल्याचे चीनने म्हटले आहे. दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याची आवश्‍यकता आहे आणि दहशतवादाच्या विरोधातील लढ्यातील पाकिस्तानच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय समुदायाने श्रेय दिले पाहिजे, असे ल्यू कांग यांनी सांगितले.

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला : विहिंप
चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देशभरातील जनतेला केले आहे. चीनविरोधात केंद्र सरकारने लवकरात लवकर भूमिका घ्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र कुमार जैन यांनी केली.