जपानमध्ये 7.4 रिश्‍टर स्केलचा भूकंप

Japan Earthquake
Japan Earthquake

टोकियो : पहाटेच्या सुमारास बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्‍क्‍यामुळे जपानमध्ये आज (मंगळवार) त्सुनामीचा इशारा देण्यात आला. हा भूकंपाचा धक्का 7.4 रिश्‍टर स्केलचा होता. फुकुशिमा येथील अणुउर्जा प्रकल्पाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपामुळे तीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतील, असा इशारा देण्यात आला होता. पण प्रत्यक्षात किनाऱ्यावर धडकलेल्या त्सुनामीच्या लाटा कमी उंचीच्या आणि तीव्रतेच्या होत्या. याच भागात 2011 मध्ये झालेल्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे 18 हजार जणांचा मृत्यु झाला होता. तसेच, फुकुशिमाच्या अणुउर्जा प्रकल्पातील 'कुलिंग सिस्टिम'ही बंद पडल्यामुळे किरणोत्सर्गही झाला होता.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या भूकंपामुळे फुकुशिमा प्रकल्पाचे नुकसान झालेले नाही. त्सुनामीमुळे कोणतेही नुकसान झाल्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. या भूकंपाची तीव्रता इतकी होती, की फुकुशिमापासून 100 मैल अंतरावर असलेल्या टोकियोमध्येही त्याचे धक्के जाणवले. टोकियोमधील इमारतींमध्ये किमान 30 सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवले.

भूकंप आणि त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे दहा हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. फुकुशिमाच्या किनाऱ्यावर एक मीटर उंचीच्या लाटा धडकल्या. 'यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही,' असे मंत्रिमंडळातील मुख्य सचिव योशिहिदे सुगा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या भूकंपानंतर फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पातील तिसऱ्या रिऍक्‍टरमधील 'कुलिंग सिस्टिम' काही वेळ बंद पडली होती. याची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

फुकुशिमा आणि जपानमधील इतरही ठिकाणी या भूकंपामुळे फारसे नुकसान झालेले नाही. 2011 मधील विध्वंसक भूकंपानंतर फुकुशिमामधील संरक्षक यंत्रणा अद्ययावत करण्ण्यात आली होती. त्यामुळे उंच लाटा उसळल्या असल्या, तरीही अणुउर्जा प्रकल्पाचे नुकसान झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com