"सर्पकुळाचे अग्रणी, बराक ओबामा यांस...'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

9/11 चा हल्ला घडविण्यासाठी, भांडवलवादी अर्थव्यवस्था उध्वस्त करण्यासाठी, तुम्हाला नेमक्‍या अडचणीत पकडण्यासाठी; आणि लोकशाही व स्वातंत्र्याचे रक्षणकर्ते असल्याचा तुमचा खोटा दावा उघड करण्यासाठी अल्लाने आम्हांस मदत केली

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील जागतिक व्यापार केंद्रास लक्ष्य करत घडविण्यात आलेला 9/11 चा दहशतवादी हल्ला हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचाच परिणाम होता, असा दावा खलिद शेख मोहम्मद या दहशतवाद्याने केला आहे.

मोहम्मद याने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये हा दावा केला आहे. ओबामा यांनादेखील या पत्रामध्ये मोहम्मद याच्याकडून शेलकी विशेषणे बहाल करण्यात आली आहेत. "सर्पकुळाचे अग्रणी, बराक ओबामा. जुलुम व दडपशाही करणाऱ्या देशाचे नेते' अशा पत्त्यावर हे 18 पानी पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रावर 8 जानेवारी, 2015 अशी तारीख आहे. मात्र हे पत्र यानंतर दोन वर्षांनी व्हाईट हाऊस येथे पोहोचले.ओबामा यांच्या अध्यक्षीय कार्यकाळाचा हा अखेरचा दिवस होता!

"आम्ही 9/11 सह तुमच्याविरोधात युद्ध सुरु केले नाही; तर तुम्ही व आमच्या भूमीत असलेल्या तुमच्या हुकूमशहांनी या युद्धास प्रारंभ केला. 9/11 चा हल्ला घडविण्यासाठी, भांडवलवादी अर्थव्यवस्था उध्वस्त करण्यासाठी, तुम्हाला नेमक्‍या अडचणीत पकडण्यासाठी; आणि लोकशाही व स्वातंत्र्याचे रक्षणकर्ते असल्याचा तुमचा खोटा दावा उघड करण्यासाठी अल्लाने आम्हांस मदत केली,'' असे मोहम्मद याने या पत्रामध्ये म्हटले आहे. मोहम्मद याने पत्रामध्ये इस्राईल व ज्यूंचाही उल्लेख केला आहे.

"गाझामध्ये ठार करण्यात आलेल्या आमच्या बंधु व भगिनींच्या रक्ताने तुमचे हात अजूनही माखलेले आहेत,'' असे मोहम्मद म्हटले आहे. मोहम्मद हा सध्या ग्वाटानामो बे येथील कुप्रसिद्ध तुरुंगामध्ये आहे. मोहम्मद याचा 9/11 घडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग होता, असे मानले जाते.

Web Title: 9/11 mastermind blasts 'head of snake, Barack Obama' in letter