सरत्या वर्षात 93 माध्यम प्रतिनिधींच्या हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

ब्रुसेल्स (बेल्जियम) : सरत्या वर्षात अर्थात 2016 या एकाच वर्षात माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या २३ देशातील एकूण 93 माध्यम प्रतिनिधींची हत्या झाल्याची माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

ब्रुसेल्स (बेल्जियम) : सरत्या वर्षात अर्थात 2016 या एकाच वर्षात माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या २३ देशातील एकूण 93 माध्यम प्रतिनिधींची हत्या झाल्याची माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

आयएफजेने 2016 या एका वर्षांत कामाशी संबंधित बाबींमुळे मृत्यू झालेल्या 93 माध्यम प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध केली आहे. 29 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत ठरवून केलेली हत्या, बॉम्ब हल्ला, सीमेपलिकडील गोळीबार या कारणांमुळे माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या 93 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. इराकमध्ये 2016 या वर्षात तब्बल 15 माध्यम प्रतिनिधींची हत्या झाली. त्या खालोखाल अफगाणिस्तान (13), मॅक्‍सिको (11), येमेन (8), ग्वातेमाला (6), सिरीया (6), भारत (5) आणि पाकिस्तान (5) यांचा क्रमांक लागतो. भारतामधील तरुण मिश्रा, इंद्रदेव यादव, राजदेव रंजन, किशोर दवे, धर्मेंद्र सिंह या जणांची हत्या झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

येमेन, भारत, पाकिस्तान आणि सिरीया या देशांमध्ये मागील वर्षी जेवढ्या माध्यम प्रतिनिधींच्या हत्या झाल्या होत्या, त्यामध्ये फारसा बदल झालेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या आकडेवारीवरून माध्यम प्रतिनिधींवरील हल्ले कमी झाल्याचे दिसत नाही, असे सांगत आयएफजेचे अध्यक्ष फिलिपी लुरिथ यांनी माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे आयएफजे?
पत्रकारांचे अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी काम करणारी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट ही जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. जगातील 140 पेक्षा अधिक देशांमध्ये संघटनेचे 6 लाखांहून अधिक सदस्य आहेत. बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे संघटनेचे मुख्य कार्यालय आहे. सर्वांत पहिल्यांदा 1926 साली पॅरिस येथे संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर 1946 आणि 1952 मध्ये संघटनेची पुन्हा नव्याने सुरूवात झाली.

Web Title: 93 media professionals killed in 2016