जर्मनीतील अपघातात 18 ठार झाल्याची भीती

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी बस ट्रकवर आदळल्यानंतर बसने पेट घेतला. बसला लागलेल्या आगीत अनेक जण होरपळले. एकूण 30 जण गंभीर जखमी झाले असून, 18 जण बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले

बर्लिन - ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी बस ट्रकवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात जर्मनीत 18 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जर्मनीतील बव्हेरिया राज्यात हा अपघात झाला असून, त्यात 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी पहाटे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी बस ट्रकवर आदळल्यानंतर बसने पेट घेतला. बसला लागलेल्या आगीत अनेक जण होरपळले. एकूण 30 जण गंभीर जखमी झाले असून, 18 जण बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेपत्ता असलेल्या 18 जणांचा बसला लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. बस जळून खाक झाल्यामुळे अनेक मृतदेहांची ओळख पटविणे अवघड बनले आहे.
बव्हेरिया राज्यातील म्यूनचेनबर्ग शहराजवळ ए-9 महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्या वेळी बसची ट्रकला जोरदार धडक बसली. त्यामुळे बसने पेट घेतल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अपघातग्रस्त बसमध्ये दोन चालक आणि 46 प्रवाशी होते. बसमधील सर्व नागरिक जर्मन होते. अपघातानंतर या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. बर्लिन ते म्युनिच या शहरांना हा महामार्ग जोडतो. ट्रक चालकाबद्दल अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Accident in Germany