हिटलरच्या फोनचा 1.63 कोटी रुपयांना लिलाव

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सर्वांत विनाशकारी "अस्त्र"

नाझी जर्मनीचे तत्कालीन लष्कर वेहरमाख्टने हिटलरला भेट म्हणून दिलेला हा फोन म्हणजे अनेकांच्या मृत्युला कारणीभूत ठरणारे सर्वांत विनाशकारी "अस्त्र" असे म्हणता येईल, अशा शब्दांत अॅलेक्झांडर हाऊसने या फोनचे वर्णन केले आहे. 
 

वॉशिंग्टन- दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने आपल्या सैन्याला अनेक आदेश ज्या फोनवरून दिले तो त्याचा वैयक्तिक वापरातील फोन तब्बल 2.43 लाख डॉलर म्हणजे 1 कोटी 63 लाख डॉलर एवढ्या किमतीला विकले गेले. 

मूळ काळ्या रंगाचा बेकलाईचा हा फोन नंतर तांबड्या रंगाने रंगविण्यात आला होता. त्यावर हिटलरचे नाव कोरण्यात आले होते. नाझीवादी हिटलरशाहीचा पराभव झाल्यानंतर 1945 मध्ये त्याच्या बर्लिन येथील बंकरमध्ये हा ऐतिहासिक फोन मिळाला होता. 

हिटलरच्या फोनचा लिलाव करणाऱ्या अॅलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शन्स या अमेरिकन संस्थेने हा फोन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले नाही. हा फोन दोन ते तीन लाख डॉलरपर्यंत विकला जाईल असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला होता. लिलावाची सुरवात एक लाख डॉलरपासून करण्यात आली होती. 

सुमारे 70 वर्षांहून अधिक जुना असलेला सिमेन्स कंपनीचा हा 'रोटरी' प्रकारचा आहे. हिटलरशाहीचे बोधचिन्ह असलेले स्वस्तिक आणि गरुडाचे ठसे त्यावर उमटविण्यात आलेले आहेत. 
नाझी जर्मनीचे तत्कालीन लष्कर वेहरमाख्टने हिटलरला भेट म्हणून दिलेला हा फोन म्हणजे अनेकांच्या मृत्युला कारणीभूत ठरणारे सर्वांत विनाशकारी "अस्त्र" असे म्हणता येईल, अशा शब्दांत अॅलेक्झांडर हाऊसने या फोनचे वर्णन केले आहे. 
 

Web Title: Adolf Hitler's Personal Phone Sells For More Than $240,000