तालिबान अफगाणिस्तानातील हल्ले वाढविणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

फगाणिस्तानचा अर्ध्याहून अधिक भूभाग तालिबानच्या अधिपत्याखाली असल्याचे मागे स्पष्ट झाले असून, हा संघर्ष शांततापूर्ण तोडगा काढून संपवण्याचे आतापर्यंत सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले आहेत...

काबूल - अफगाणिस्तानतील हल्ले आणखी तीव्र करत येथील राजकीय पकड मजबूत करण्याचा निर्धार अफगाण-तालिबान संघटनेने व्यक्त केला आहे.

अफगाणिस्तान व त्यांच्या समर्थनार्थ लढणाऱ्या अमेरिकी लष्करावरील हल्ल्यांत आता वाढ केली जाणार आहे, असे तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. आपल्या नियंत्रणाखालील परिसराचा सामाजिक न्याय आणि विकासाशी संबंधित संस्थांची निर्मिती करण्याकडे तालिबानने लक्ष केंद्रित केल्याचेही त्यात नमूद आहे. अफगाणिस्तानचा अर्ध्याहून अधिक भूभाग तालिबानच्या अधिपत्याखाली असल्याचे मागे स्पष्ट झाले असून, हा संघर्ष शांततापूर्ण तोडगा काढून संपवण्याचे आतापर्यंत सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले आहेत.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानच्या लष्करावर केलेल्या हल्ल्यात नव्याने भरती झालेल्या 135 सैनिकांचा मृत्यू झाला होता. यावरून तीव्र संताप व्यक्त झाल्याने संरक्षण मंत्री व लष्कर प्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामा दिला आहे.

ऑपरेशन मनसोरी
तालिबानने 'ऑपरेशन मनसोरी' या नावाने एक मोहीम उघडली असून, त्याअंतर्गत अफगाणिस्तान व अमेरिकी लष्करावर हल्ले होणार आहेत. गेल्या वर्षी ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला तालिबानी नेता मुल्ला अख्तर मनसोर याच्या नावावरून मोहिमेस हे नाव देण्यात आले आहे.

Web Title: Afghan Taliban announce spring offensive