स्फोटांनी अफगाणिस्तान हादरले; 50 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

या स्फोटामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत, कंदाहारचे गव्हर्नर व अमिरातीच्या अन्य काही राजनैतिक अधिकाऱ्यांसह या स्फोटामध्ये किमान 16 जण जखमी झाले. या स्फोटामुळे काही जणांची शरीरे ओळखू न येण्याइतपत जळाली आहेत

कंदाहार - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलसह देशातील अन्य दोन महत्त्वपूर्ण शहरांमध्ये घडविण्यात आलेल्या स्फोटांमध्ये किमान 50 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

दक्षिण अफगाणिस्तानमधील कंदाहार प्रांतामध्ये येथील गव्हर्नरच्या निवासस्थानाजवळ झालेल्या स्फोटामध्ये किमान 9 नागरिक मृत्युमुखी पडले. जुमा मोहम्मद अब्दुल्ला अल काबी हे संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत हे सध्या या भागाच्या भेटीवर आहेत. या स्फोटामध्ये ते, कंदाहारचे गव्हर्नर व अमिरातीच्या अन्य काही राजनैतिक अधिकाऱ्यांसह या स्फोटामध्ये किमान 16 जण जखमी झाले. या स्फोटामुळे काही जणांची शरीरे ओळखू न येण्याइतपत जळाली आहेत.

या स्फोटाच्या काहीच तास आधी तालिबानने घडविलेल्या दोन स्फोटांमध्ये किमान 30 ठार; तर 80 जखमी झाले. अफगाणिस्तानमधील लोकप्रतिनिधींची कार्यालये या ठिकाणापासून जवळच आहे. याशिवाय, हेल्मंड या देशातील अशांत प्रांताची राजधानी असलेल्या लष्कर गाह येथेही तालिबानी दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 7 जण ठार झाले. या स्फोटांमधील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

अफगाणिस्तानमध्ये राजकीय स्थिरता कायम ठेवण्यासाठी येथील नेतृत्व संघर्ष करत असतानाच तालिबानकडून घडविण्यात आलेले हे हल्ले अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहेत.

Web Title: Afghanistan bombed;50 dead