वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचं निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

रस्ता ओलांडताना कारने धडक दिल्यानंतर क्रिकेटपटू बेशुद्ध होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते.

काबुल - अफगाणिस्तानचा सलामीवीर नजीबुल्लाह तारकाई याचे मंगळवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी कारने दिलेल्या धडकेत नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला होता. नंगरहार इथं रस्ता ओलांडताना एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. यामध्ये नजीबुल्लाह तारकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नजीबुल्लाहच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावरून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. 

नजीबुल्लाहवर आय़सीयुमध्ये उपचार सुरु होते. अपघातानंतर तो बेशुद्धावस्थेतच होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तारकाई कोमात गेला. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती याआधीच देण्यात आली होती. क्रिकेटविश्वावर गेल्या चार दिवसातला दुसरा आघात आहे. तारकाईचा अपघात झाला त्याच दिवशी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या एका हल्ल्यात क्रिकेट अंपायरचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

तारकाईने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने 12 टी 20 आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. टी20 मध्ये त्याने चार अर्धशतकांसह 258 धावा केल्या आहेत. तर 24 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 2030 धावा केल्या असून यामध्ये सहा शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. नुकतंच त्यानं शापागीजा क्रिकेट लीगमध्ये मीस आयनक नाइटसचं प्रतिनिधित्व केलं होतं.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afghanistan Cricketer Najeeb Tarakai dies at 29 after car accident