भारताकडून अफगाणला ५ लाख डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताकडून अफगाणला ५ लाख डोस
भारताकडून अफगाणला ५ लाख डोस

भारताकडून अफगाणला ५ लाख डोस

नवी दिल्ली : भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानला (Afghanistan) कोव्हॅक्सिनचे पाच लाख डोस दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला (Indira Gandhi Hospital) लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात देखील लसीची आणखी पाच लाखांची खेप अफगाणिस्तानला पाठवण्यात येणार आहे. भारतात अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दजई यांनी भारताच्या मदतीबद्दल आभार मानले आहे.

हेही वाचा: महिनाअखेर कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता

अफगाणिस्तानात तालिबान राजवटीमुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. गरीबी, भूक आणि बेरोजगारीचा सामना करणाऱ्या लोकांचे आरोग्यमान देखील ढासळले आहे. त्यामुळे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनपासून बचाव करणे देखील कठीण मानले जात आहे. मात्र पाकिस्तान आणि चीनच्या अगोदर भारताने अफगाणिस्तानकडे मदतीचा हात पुढे केला असून काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयास पाच लाख डोस उपलब्ध करून दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार या महिन्याच्या प्रारंभीच भारताने अफगाणिस्तानला १.६ टन आरोग्य सामग्री रवाना केली आहे. ही मदत जागतिक आरोग्य संघटनेमार्फत देण्यात आली आहे. आगामी काळात आणखी मदत केली जाणार आहे.

अमेरिकेत २० लाख रुग्ण

ओमिक्रॉन संसर्ग वाढीमुळे अमेरिकेची स्थिती बिघडत चालली आहे. रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाची लाट आल्यानंतर प्रथमच अमेरिकेत एका आठवड्यात २० लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत २४.९ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्ये ३ ते ९ तारखेदरम्यान सर्वाधिक १.७ लाख रुग्णांची नोंद झाली होती. ओमिक्रॉन येण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये केवळ २५ लाख रुग्णांची संख्या नोंदली गेली होती. आता मात्र दररोज सरासरी साडेतीन लाख रुग्णांना बाधा होत आहे.

हेही वाचा: ऐतिहासिक कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा...

नवीन वर्षाचा कार्यक्रम रद्द

कोरोना आणि आता ओमिक्रॉनमुळे संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत निर्बंधात झाले. यादरम्यान व्हॅटिकन सिटी येथे नवीन वर्षानिमित्त होणारा जल्लोष पोप फ्रान्सिस यांनी रद्द केला आहे. सेंट पीर्ट्स स्क्वेअर येथे होणारा स्वागत सोहळा पोप यांनी रद्द केला आहे. नागरिकांची होणारी गर्दी पाहता पोप यांनी निर्णय घेतला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोप सेंट पीटर्स स्क्वेअरच्या नेटेविटी सीनवर जातात. परंतु यंदा गेले नाही.

पाकिस्तानात एकाच कुटुंबात ११ जणांना बाधा

पाकिस्तानच्या लाहोर शहरात एकाच कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यात ओमिक्रॉनची लक्षणे आढळून आली आहेत. देशात काल ५१५ जणांना कोरोनाची बाधा झाली. दोन महिन्यानंतर प्रथमच पाचशेचा आकडा पार केला आहे. यादरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात २८ हजार ९२७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडेसहाशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच इस्लामाबाद येथे ओमिक्रॉनचे बारा रुग्ण आढळून आले. यादरम्यान, पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने देशात फेब्रुवारीत पाचवी लाट येण्याचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top