अफगाणिस्तानमधील स्फोटात बसमधील 32 प्रवासी ठार

अफगाणिस्तानमधील स्फोटात बसमधील 32 प्रवासी ठार

कंदहार : अफगाणिस्तानमधील हेरत-कंदहार महामार्गावर बुधवारी सकाळी रस्त्याच्या कडेला झालेल्या शक्तीशाली बॉंबस्फोटात बसमधील महिला व मुलांसह 32 प्रवासी ठार झाले. 15 प्रवासी जबर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे फराह प्रांताच्या पोलिस प्रमुखांचे प्रवक्‍ते मोहीबुल्ला मोहीब यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी हा परिसर नागरिकांसाठी बंद केला असून, तपास सुरू झाला आहे. स्फोटाची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नसली तरी या भागात तालिबानी दहशतवाद्यांचे वर्चस्व असून, सरकारी अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करीत येथे रस्त्याच्या कडेला अनेकदा स्फोट केले जातात. 

अफगाणिस्तानमधील गेल्या 18 वर्षांची यादवी संपुष्टात आणून शांतता नांदण्यासाठी तालिबान व अमेरिकेच्या चर्चेच्या अनेक फैरी झाल्या आहेत. मात्र या दरम्यान स्फोट घडवून आणण्याचे तालिबान्यांचे सत्र सुरूच आहे. देशात यंदा पहिल्या सहा महिन्यांत नागरिकांचे जे बळी गेले आहेत, त्याचे प्रमुख कारण म्हणजे अफगाण सैन्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचे सहयोगी सैन्यगट असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या पथकाने मंगळवारी (ता. 29) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदविले आहे. यानंतर आज हा दहशतवादी हल्ला झाला. 

कमकुवत सुरक्षा व्यवस्था 

अफगाणिस्तानमध्ये रविवारी (ता. 28) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अमरुल्ला सालेह यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. यात 20 जणांचा मृत्यू झाला होता आणि 50 जण जखमी झाले होते. निवडणूक प्रचाराच्या आदल्या दिवशीच हा हल्ला झाल्याने देशातील कमकुवत सुरक्षा व्यवस्था पुन्हा उघड झाली. "ग्रीन ट्रेंड' या सामाजिक संस्थेच्या कार्यालयावर सायंकाळी झालेल्या हल्ल्यातून सालेह सुदैवाने बचावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com