अफगाणिस्तानातील स्थैर्य भारत-पाकिस्तान संबंधांसाठी पोषक

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

अफगाणिस्तानमध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी भारताने मोठे प्रयत्न केले असल्याचे कौतुक टिलरसन यांनी या वेळी केले. "तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांना आम्ही इशारा देतो की, आम्ही कोठेही जाणार नाहीत. तुमची मानसिकता बदलेपर्यंत आणि अफगाणिस्तान सरकारशी जुळवून घेत विकासाच्या मार्गावर तुम्ही जाईपर्यंत आम्ही येथेच थांबू,' असे ते म्हणाले.

वॉशिंग्टन - अफगाणिस्तानात स्थैर्य आणि शांतता निर्माण झाल्यास भारत-पाकिस्तान संबंधांसाठी ते पोषक वातावरण ठरेल, असे मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी आज व्यक्त केले. युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या विकासाचे ध्येय साध्य करण्यात भारत आणि पाकिस्तान हे अमेरिकेचे महत्त्वाचे सहकारी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

आगामी भारत दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर टिलरसन यांनी "सीएसआयएस' या अमेरिकी सरकारचा प्रमुख "थिंक टॅंक' समजल्या जाणाऱ्या संस्थेत आपले पहिले मोठे भारत धोरण स्पष्ट केले. ""स्थिर अफगाणिस्तानचे ध्येय साध्य झाले की पाकिस्तानच्या स्थैर्यातील मोठा अडथळा दूर होईल. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांसाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे संपूर्ण प्रदेशामध्येच शांतता निर्माण होईल. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारत-पाकिस्तान दरम्यान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीही आमचा समन्वय सुरू आहे,'' असे टिलरसन म्हणाले. अफगाणिस्तान आता दहशतवाद्यांना आश्रय देत नसून, या देशामध्ये शांतता निर्माण करण्याचे आमचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी भारताचे सहकार्य आवश्‍यक असल्याचेही टिलरसन या वेळी म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी भारताने मोठे प्रयत्न केले असल्याचे कौतुक टिलरसन यांनी या वेळी केले. "तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांना आम्ही इशारा देतो की, आम्ही कोठेही जाणार नाहीत. तुमची मानसिकता बदलेपर्यंत आणि अफगाणिस्तान सरकारशी जुळवून घेत विकासाच्या मार्गावर तुम्ही जाईपर्यंत आम्ही येथेच थांबू,' असे ते म्हणाले.

पाकलाही जाणार
परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन हे पाकिस्तानलाही जाणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दक्षिण आशियाबाबतच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी टिलरसन पाकिस्तानला भेट देतील, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबतच्या तारखा अद्याप निश्‍चित झालेल्या नाहीत.

शंभर वर्षांची दिशा
रेक्‍स टिलरसन यांनी अमेरिकेच्या भारतविषयक धोरणाबाबत आज प्रथमच सविस्तर भाषण करत द्विपक्षीय संबंध दृढ असल्याची ग्वाही दिली. टिलरसन यांच्या भाषणामुळे भारत-अमेरिका संबंधांची पुढील शंभर वर्षांची दिशा ठरवली गेली असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. टिलरसन पुढील आठवड्यात भारतात येत असून, ट्रम्पही पुढील महिन्यात जपान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम आणि फिलीपीन्सच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे टिलरसन यांचे भाषण चीनसह आशियाई देशांनी लक्षपूर्वक ऐकले असेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. टिलरसन यांनी आपल्या भाषणात भारत ही अमेरिकेसाठी योग्य संधी असल्याचे सांगितल्याने अमेरिकेचा प्राधान्यक्रम जगाला समजला असेल, असेही हा अधिकारी म्हणाला. अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील धोरणांमध्ये भारत हा अत्यंत महत्त्वपूर्ण सहकारी असल्याने ट्रम्प प्रशासन भारताला अतिशय महत्त्व देत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: afghanistan india pakistan usa