अक्षय कुमार ठरला 'मालामाल' सेलिब्रिटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

गेल्या वर्षी अक्षयने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपयांपासून 68 कोटी रुपये मानधन घेतले होते. 2018च्या यादीत अक्षय 270 कोटी रुपये कमाईसह 76 व्या स्थानी होता.

मुंबई : 'फोर्ब्स' मासिकाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगाभरातील 100 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. यंदा या यादीत अभिनेता अक्षय कुमार या एकाच भारतीयाचा समावेश झाला आहे. या यादीत त्याचा 33 वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे यादीतील पहिल्या दहांमध्ये लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो व नेमार या लोकप्रिय फुटबॉलपटूंसह एका मुष्टियोध्याचाही समावेश आहे. 

'हायएंड पेड सेलिब्रिटी'च्या यादीत अक्षयचा 33 वा क्रमांक आहे. त्याची वार्षिक कमाई 6.5 कोटी डॉलर (444 कोटी रुपये) आहे. या यादीत अमेरिकेची गायिका टेलर स्विफ्ट सर्वोच्च स्थानी आहे. तिची कमाई 18.5 कोटी डॉलर (1,263 कोटी रुपये) आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये दुसरा क्रमांक अमेरिकेच्या महिला उद्योजक कायली जेनर यांनी पटकाविला आहे. त्यांची कमाई 17 कोटी डॉलर (1161 कोटी रुपये) आहे. 

गेल्या वर्षी अक्षयने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपयांपासून 68 कोटी रुपये मानधन घेतले होते. 2018च्या यादीत अक्षय 270 कोटी रुपये कमाईसह 76 व्या स्थानी होता. यंदा त्यांनी 33 व्या स्थानावर उडी घेतली आहे. "दबंग' अभिनेता सलमान खान मात्र यंदा यादीतून बाहेर पडला आहे. 2018 मध्ये सलमान 3.77 कोटी डॉलर (257 कोटी रुपये) कमाईसह 82 व्या क्रमांकावर होता. बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान हा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. 2017 मध्ये त्याचा क्रमांक 65 वा होता. 

पहिल्या दहा सेलिब्रिटींची कमाई (रुपये कोटींत) 

टेलर स्विफ्ट गायिका - अमेरिका 1263
कायली जेनर महिला उद्योजक - अमेरिका 1161 
कान्ये वेस्ट संगीतकार - अमेरिका 1024 
लिओनेल मेस्सी

फुटबॉलपटू - अर्जेंटिना

867
एड शेरन संगीतकार - ब्रिटन 751
ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलपटू - पोर्तुगाल 744 
नेमार फुटबॉलपटू - ब्राझील 717 
द ईगल्स संगीतकारांचा गट - अमेरिका 683 
डॉ. फिल मॅकग्रा टीव्ही सेलिब्रिटी - अमेरिका 649 
कनेलो अलव्हरेज मुष्टियोद्धा - अमेरिका 642
अक्षय कुमार (33 वा क्रमांक) अभिनेता - भारत 444 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar is the only Indian Richest Celebrity in the Forbes magazine