अमेरिकेत आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी?

पीटीआय
Thursday, 14 November 2019

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाच्या कारवाईच्या प्रक्रियेला बुधवार (ता. १३) पासून सुरवात होत असून, त्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे, त्यामुळे या काळात राजकीय आरोप- प्रत्यारोपांची मोठी आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाच्या कारवाईच्या प्रक्रियेला बुधवार (ता. १३) पासून सुरवात होत असून, त्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली आहे, त्यामुळे या काळात राजकीय आरोप- प्रत्यारोपांची मोठी आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करावेत म्हणून युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव टाकला, असा डेमोक्रॅटिक पक्षाचा आक्षेप आहे. महाभियोगाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून हा आरोप सिद्ध करण्यासाठी डेमोक्रॅटिक संसद सदस्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रिपब्लिकन पक्षानेही तयारी केली असल्याचे समजते.

दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असून, आपली चौकशी करणे हे बेकायदा कृत्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असून, आपण काहीही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे काळजीचे कारण नाही, असे ट्रम्प यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america Accusation transposition donald trump