
अमेरिकेमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वॉशिंग्टन- कोरोना विषाणू (Coronavirus) ने जगभरात थैमान घातले आहे. पण, महाशक्ती असलेल्या अमेरिकेला या विषाणूने जास्त पिडल्याचे दिसत आहे. कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावीत देश अमेरिका ठरला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. गुरुवारी अमेरिकेत 90 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे.
अमेरिकेत गेल्या 24 तासात 91,295 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले, त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 89 लाखांच्या पार गेली आहे. जॉन हॉप्किंस युनिव्हर्सिटीने यासंबंधीची माहिती दिली आहे. अमेरिकेमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना महामारीने पुन्हा वेग पकडल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 1,021 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2,28,625 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधित मृत्यू अमेरिकेमध्ये नोंदले गेले आहेत.
मोठी बातमी! रशियाच्या स्पुटनिक-5 लशीची चाचणी थांबवली
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत 80 हजारांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. शनिवारी देशात 88,973 कोरोनाबाधित सापडले होते. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 89.4 लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. अशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील 3 कोरोना लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. यातील फाइझर कंपनीने 2020 मध्ये कोरोना लस उपलब्ध होईल असा दावा केला आहे. शिवाय जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून 2021 च्या सुरुवातीपर्यंत प्रभावी कोरोना लस मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.