
कोरोना विषाणूवरील लस आता लवकरच सर्वांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
वॉशिंग्टन- कोरोना विषाणूवरील लस आता लवकरच सर्वांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये तर पुढील आठवड्यापासून फायझर कंपनीची लस आपात्कालीन वापरासाठी उपलब्ध असणार आहे. त्यातच आता अमेरिकेचे तीन माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बूश कॅमेऱ्यासमोर सार्वजनिकरित्या कोविड-19 लस घेणार आहेत. नियोजित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हेही सर्वांसमोर लस टोचून घेतील. लोकांमध्ये लशीबाबत विश्वास निर्माण व्हावा, यासाठी असे करण्यात येणार आहे.
माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सीरियस XM ला दिलेल्या रेडियो मुलाखतीत म्हटलं की, अमेरिकेचे संसर्ग रोग विशेषज्ञ एंथोनी फौसी यांनी कोविड-19 लशीला परवानगी दिल्यास ते डोस घेण्यासाठी उपबल्ध असतील. ओबामा पुढे म्हणाले की, लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होणार असेल, तर मी ती पहिल्यांदा टोचून घेईन. कॅमेऱ्यासमोर लस टोचून घेण्यासही माझी सहमती आहे. यामुळे लोकांना कळेल की माझा विज्ञानानर विश्वास आहे, जो कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवू शकतो.
अभिमानास्पद! महात्मा गांधींच्या विचारांना चालना देण्यासाठी अमेरिकेत कायदा
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे चीफ ऑफ स्टाफ राहिलेले फ्रेडी फोर्ड यांनी सीएनएनला सांगितले की, बुश यांना लशीच्या प्रमोशनसाठी मदत करण्याची इच्छा आहे. बुश यांना वाटतं की लोकांना दिली जाणारी कोरोनोवरील लस सुरक्षित असावी. त्यामुळे ते ही लस कॅमेऱ्यासमोर घेण्यास तयार आहेत.
बिल क्लिंटन यांच्या प्रेस सेक्रेटरी एंजेल उरेना यांनीही सीएनएनशी बोलताना सांगितले की, माजी राष्ट्राध्यक्ष टेलिव्हिजनवर सार्वजनिकरित्या लस घेण्यासाठी उपस्थित राहतील. यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते की, सार्वजनिकरित्या लस घेण्याची त्यांची इच्छा आहे.
दरम्यान, अमेरिकेत काही लशी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांनी लस प्रभावी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नियामक मंडळाने या लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिल्यास डिसेंबरच्या शेवटापर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ती उपलब्ध होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर लोकांमध्ये लशीबाबत विश्वासार्हता वाढावी, यासाठी अमेरिकेतील महत्वाच्या व्यक्ती लस सर्वातआधी टोचून घेण्याची तयारी दाखवत आहेत.