America Joe Biden Putin chemical weapons war against Ukraine nato g20
America Joe Biden Putin chemical weapons war against Ukraine nato g20sakal

रासायनिक हल्ल्यांना चोख उत्तर देऊ; ज्यो बायडेन

बायडेन यांचा इशारा; रशियाला ‘जी २०’मधून बाहेर काढण्याचे आवाहन

ब्रुसेल्स : ‘‘युक्रेनविरोधातील युद्धात पुतीन यांनी रासानिक शस्त्रांचा वापर केल्यास ‘नाटो’ याला जशास तसे उत्तर देईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला औद्योगिक आण विकसनशील देशांच्या ‘जी २०’ गटातून बाहेर काढायला पाहिजे, असे आवाहन करीत तसे केल्यास रशिया जगातील शक्तीशाली अर्थव्यवस्थांपासून तुटेल, असे ते म्हणाले. उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (नाटो) परिषदेत बायडेन यांचे गुरुवारी भाषण झाले. रशियाचे युक्रेनमधील हल्ले आणि जर पुतीन यांनी रासायनिक, जैविक आणि अण्वस्त्रांचा वापर केला तर त्याला उत्तर कसे द्यायचे हे ठरविण्यासाठी ‘नाटो’सदस्यांची काल चर्चा झाली.

बायडेन म्हणाले, की रशियाकडून रासयनिक हल्ले झाल्यास त्यांनाही त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. याबाबचा निर्णय वेळ पाहून घेतला जाईल. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या कारवाईबद्दल रशियाला ‘जी२०’ गटातून बाहेर काढायला हवे. रशियाला संघटनेतून वगळण्यास सदस्य देशांची मंजुरी न मिळाल्यास ‘नाटो’च्या बैठकीत सहभाग घेण्याची परवानगी युक्रेनला दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘नाटो’चे सदस्यांमध्ये आज दिसणारी एकजूट यापूर्वी कधीही दिसली नव्हती. युक्रेनवरील हल्ल्यानंतर पुतीन यांना उलट परिणाम मिळत आहेत, असे सांगत एक लाख युक्रेनी निर्वासितांचे स्वागत करण्याची तयारी अमेरिकेने यावेळी दाखविली.

मारिउपोलमध्ये ३०० ठार?

खारकिव्ह ः युक्रेनमधील मारिउपोल शहरात मागील आठवड्यामध्ये रशियाने एका चित्रपटगृहावर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ३०० लोक मरण पावल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. सोळा मार्च रोजी हा हल्ला करण्यात आला होता. युक्रेनच्या संसदेचे मानवी हक्क आयुक्त लुडम्याला देनिसोव्हा यांनी या चित्रपटगृहाच्या इमारतीमध्ये १ हजार ३०० पेक्षाही अधिक लोकांना आश्रय घेतला होता असा दावा केला आहे.

रशियाच्या हल्ल्यामध्ये मारिऊपोल शहर अक्षरशः उद्‍ध्वस्त झाले आहे. किव्ह शहरातील मृतांचा आकडाही वाढत चालला असून लोकांना पेयजल आणि खाद्यपदार्थांसाठी धावाधाव करावी लागत आहे. दुसरीकडे रशियन हल्ल्याची धार वाढत असल्याने युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी युरोपीय महासंघाकडे तातडीने सदस्यत्व देण्याची मागणी केली आहे. रशियावर नव्याने कठोर आर्थिक निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली. तत्पूर्वी जर्मनीने रशियाकडून युरोपीय देशांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखला आहे. जर्मनीने हे निर्बंध आधीच घालायला हवे होते असे मत युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी मांडले आहे.

९ मे रोजी युद्ध संपणार?

युक्रेन लष्कराच्या दाव्यानुसार, रशिया ९ मे रोजी हे युद्ध संपवू इच्छितो. ‘किव्ह इंडिपेडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला हे युद्ध ९ मे पर्यंत संपले पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे. रशियामध्ये नऊ मे हा दिवस नाझी जर्मनीवरील विजय दिन म्हणून साजरा केला जातो, तोपर्यंत हा देश गिळंकृत करण्याचे कारस्थान पुतीन यांनी आखले आहे.

सैन्य तैनातीचा आदेश नाही

‘नाटो’च्या बैठकीत बायडेन यांनी रशियाविरोधात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचा इशारा दिला असला तरी युक्रेनमध्ये थेट सैनिकी कारवाई करण्यासाठी अमेरिकेने तैनातीचा कोणताही आदेश दिला नसल्याचे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिका व ‘नाटो’ युक्रेनच्या भूमीवर सैन्य तैनात करणार नाही यावर बायडेन व संघटनेच्या सदस्य देशांनी स्पष्ट केलेले आहे.

रशियाबरोबर युद्ध न करता या लढाईत युक्रेनला सहकार्य करण्याचा पर्याय ‘नाटो’ने स्वीकारला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखा चिघळू नये, यासाठी मदतीचा ओघ वाढविण्याचे आणि जर परिस्थिती गंभीर झाली तर संघटित होण्याचे आम्ही ठरविले आहे.

- इमॅन्युएल मॅक्रॉन,अध्यक्ष, फ्रान्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com