अमेरिकेचा सीरियावर हल्ला; शेकडो ठार, 400 जखमी

टीम ई सकाळ
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

आता उत्तर कोरिया, इराणचा नंबर?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सीरिया, येमेन आणि इराक या देशांमध्ये लष्करी कारवाईचे आदेश देऊन उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही अप्रत्यक्षरीत्या निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांनी जर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरुद्ध अशी कारवाई केली जाईल. अमेरिका तिथेही कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जाते.

सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. 

बंडखोर आणि सरकारी फौजा यांच्या देशांतर्गत संघर्षात पिचलेल्या सीरियात नुकताच रासायनिक हल्ला झाला होता. त्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्तिशः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सीरिया हल्ल्याची माहिती दिली. 

सीरिया सरकारने केलेल्या रासायनिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली आहे, माहिती अशी अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली. 

सीरियाविरुद्ध पहिलीच कारवाई
सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीरियाच्या हवाई तळांवर टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. व्हाईट हाऊसने सीरियाच्या सुरक्षा फौजांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाच्या इडलिबमध्ये रासायनिक हल्ल्यांसाठी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना जबाबदार धरले आहे. 

UNला डावलून कारवाई
सयुंक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत सीरियाविरुद्ध कारवाई करण्यास सहमती न झाल्याने अमेरिकेने स्पष्ट केले की, जर संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर आम्ही स्वतः सीरिया सरकारविरुद्ध कारवाई करू. 

अमेरिकी आक्रमण : सीरियन माध्यमे
हे हल्ले म्हणजे अमेरिकेचे सीरियावरील आक्रमण असल्याचे सीरियन माध्यमांनी म्हटले आहे. सीरियन सुरक्षा फौजांना थेट लक्ष्य बनविण्यात येत आहे. 

सीरियन लोकांना ट्रम्प यांचे आवाहन
सीरियन सरकारच्या हवाई तळांवर क्रूझ मिसाईलने केलेले हल्ले सीरियाच्या हिताचे आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासाठी अमेरिकेची मदत करा असे त्यांनी सीरियन नागरिकांना आवाहन केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america launches missile attack on syria