इराण अणुकरारातून अमेरिका बाहेर, ट्रम्प यांची घोषणा 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

2015 साली बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी हा अणुकरार केला होता. त्याला ट्रम्प यांनी विरोध दर्शवला होता व या करारातून अमेरिका बाहेर पडेल असा संकेत त्यांनी दिला होता. अखेरीस काल या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडली आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची मंगळवारी (ता. 8) घोषणा केली. 2015 साली बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी हा अणुकरार केला होता. त्याला ट्रम्प यांनी विरोध दर्शवला होता व या करारातून अमेरिका बाहेर पडेल असा संकेत त्यांनी दिला होता. अखेरीस काल या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडली आहे. 

इराण हा दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी यावेळी केला. बराक ओबामांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात इराणचा अमेरिका व अन्य पाच देशांसोबत अणुकरार झाला होता. त्यानुसार इराणने अण्वस्त्रनिर्मिती न करता त्या बदल्यात आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना अणुकेंद्रांच्या तपासणीची संमती दिली आणि सर्व आंतरराष्ट्रीय नियमनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. अन्य सहा देशांचीही या करारास मान्यता होती, पण अमेरिकेच्या सत्तेवर येताच ट्रम्प यांनी या करारास विरोध केला होता.  

donald trump

अखेरीस मंगळवारी माध्यमांसमोर ट्रम्प यांनी इराण अणुकरारातून माघार घेत असल्याचे सांगितले. तसेच इराण हा देश मध्य पूर्व आशियातील दहशतवादाला पाठिंबा देतो असाही आरोप ट्रम्प यांनी केला. या करारामुळे इराणच्या अण्वस्त्र निर्मितीवर निर्बंध आले नाहीत. तसेच इराण इतर देशांशी खोटं बोलत आहे व आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.

इराणला अण्वस्त्र निर्मितीत मदत करणाऱ्या इतर देशावरही निर्बंध लादले जातील व अमेरिका अशा धमक्या देणाऱ्यांना घाबरत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व गोष्टींमुळे अमेरिका इराण अणु करारातून बाहेर पडली आहे व त्याचे पडसाद आंततराष्ट्रीय स्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america withdrawal from Iran nuclear deal declared by donald trump