
USA Crime News : भारतीय वंशाच्या मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांची शिक्षा; निकाल...
नवी दिल्ली - भारतीय वंशाच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेत एका व्यक्तीला १०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०२१ मध्ये अमेरिकेतील लुइसियाना राज्यात झालेल्या भांडणादरम्यान आरोपीने गोळीबार केला होता, ज्यात शेजारच्या हॉटेलमध्ये खेळत असलेल्या मुलीच्या डोक्यात गोळी लागली होती. (Latest Marathi News)
गोळी लागल्याने मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला १०० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. केवळ दोन वर्षांत या खटल्याचा निकाल लागला.
अमेरिकेतील लुइसियाना राज्यात २०२१ मध्ये भारतीय वंशाच्या ५ वर्षीय मुलीला ठार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीला १०० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जोसेफ ली स्मिथ असे दोषीचे नाव आहे. (Marathi Tajya Batmya)
जोसेफ ली स्मिथ (३५) याला जानेवारी २०२३ मध्येच दोषी ठरवण्यात आले आहे. घटनेच्या वेळी मृत मुलगी हॉटेलच्या खोलीत खेळत असताना तिच्या डोक्यात गोळी लागली होती. गोळी लागून जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २३ मार्च 2021 रोजी तिचा मृत्यू झाला होता.
आरोपी जोसेफ ली स्मिथ हॉटेल सुपर ८ मोटेलच्या पार्किंगमध्ये दुसऱ्या व्यक्तीशी भांडत होता. याच भांडणात स्मिथने गोळीबार केला. यावेळी स्मिथने झाडलेली गोळी भांडणाऱ्या व्यक्तीला लागली नाही, तर जवळच्या खोलीत खेळत असलेल्या मुलीच्या डोक्यात लागली. मृत मुलीचे आई-वडिल या हॉटेलचे मालक असून हे कुटुंब हॉटेलच्या तळमजल्यावर राहत होते.