जर्मनीची सूत्रे पुन्हा मर्केल यांच्याकडेच 

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मतदानोत्तर कलचाचणीमध्ये मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅट पक्षाला सर्वाधिक 32 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधक यापेक्षा फारच मागे आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार निश्‍चित झालेल्या या निकालात बदल होण्याची शक्‍यता अत्यंत कमी आहे.

बर्लिन : जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानानंतर विद्यमान चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावरच नागरिकांनी विश्‍वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅन्सलरपदाचा मर्केल यांचा हा चौथा कार्यकाल असणार आहे. 

मतदानोत्तर कलचाचणीमध्ये मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅट पक्षाला सर्वाधिक 32 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधक यापेक्षा फारच मागे आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार निश्‍चित झालेल्या या निकालात बदल होण्याची शक्‍यता अत्यंत कमी आहे. या कलचाचणीनंतर मर्केल यांनी ट्विट करत युरोपीय समुदाय एकसंध ठेवण्यास यापुढेही प्राधान्य देणार असल्याचे म्हणाल्या.

"भविष्यात जर्मनीसमोर अनेक आव्हाने असून त्यांचा सामना करण्यावर भर देणार असून आणि राष्ट्रवादी विचारसरणीच्या मतदारांच्या भावनाही समजून घेतल्या जातील. या मतदारांचा विश्‍वास पुन्हा जिंकण्यासाठी चांगली धोरणे आखली जातील,'' असेही मर्केल म्हणाल्या. या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या एएफडी पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळण्याचा अंदाज आहे. या पक्षाला पूर्वी कधीही संसदेत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यामुळे जर्मनीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा प्रभाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रभाव रोखण्यात मर्केल यांना काही प्रमाणात अपयश आल्याचे या प्राथमिक अंदाजातून दिसून आले आहे. 
 

Web Title: Angela Merkel wins 4th term but nationalists surge in German vote