अंटार्क्टिका खंडालापण आता जागतिक तापमानवाढीचा फटका

antartika
antartika

साओ पाओलो (ब्राझील) - जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरवात झाली आहे. तेथील तापमानाने पहिल्यांदाच २० अंशांचा आकडा पार केला आहे.

जागतिक तापमानवाढीबाबत अनेकदा चर्चा झडल्या आहेत. तरीही पॅरीस करारावर अद्याप सर्व देशांचे एकमत होऊ शकलेले नाही. मात्र कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आता प्रत्येक देशाने आपापले उद्दिष्ट ठरवून घेण्यास सुरवात केली आहे. या तापमानवाढीचा मोठा दृश्‍य परिणाम अंटार्क्टिकामध्ये दिसून आला आहे.

अंटार्क्टिकावरील सेमूर द्विपावर उभारलेल्या संशोधन स्थानकावर ९ फेब्रुवारीला २०.७५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याआधी सर्वाधिक १९.८ अंश सेल्सिअस तापमान १९८२ मध्ये साईनी बेटावर नोंदविले गेले आहे. ब्राझीलचे संशोधक कार्लोस शिफर वृत्तसंस्थांशी बोलताना म्हणाले, ‘‘पृथ्वी गरम होत असल्याचा इशारा म्हणून अंटार्क्टिकाच्या वाढत्या तापमानाकडे पाहावे लागेल.’’

अंटार्क्टिकामधील एस्परांज बेटावरील अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर या वर्षी सहा फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्यानंतर आता पाऱ्याने २० अंशांची पातळी ओलांडली. या तापमान नोंदीची ‘वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन’द्वारा अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. 

अंटार्क्टिकातील अत्यंत दूरच्या भागातील संशोधन केंद्रांवर दर तीन दिवसांनी तापमान नोंदविले जाते. ही तापमानवाढ आश्‍चर्यकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. अंटार्क्टिकातील २३ विभागांमध्ये जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास कार्लोस शिफर करत आहेत. ते म्हणाले, ‘‘अनेक विभागांमध्ये उष्णता वाढलेली दिसून आली आहे. परंतु, आतासारखी तापमानवाढ आधी दिसून आली नव्हती. अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडील शेटलेट आयलंड आणि जेम्स रॉस द्वीप समूहामध्ये २० वर्षांमध्ये खूप चढउतार दिसून आले आहेत. २१ व्या शतकातील पहिले दशक थंड होते. परंतु, दुसऱ्या दशकात उष्णता वाढत असल्याचे दिसून आले आहे.’’

प्रवाहांचा परिणाम शक्य
ब्राझीलच्या अंटार्क्टिका कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सागरी प्रवाह आणि अल निनोच्या प्रभावामुळे तापमान वाढलेले असू शकते.

समुद्राची पातळी वाढेल
अंटार्क्टिका क्षेत्रात जगातील ७० टक्क्यांहून अधिक स्वच्छ पाणी आहे. येथील हिमनद्या व हिमखंड वितळले तर समुद्राच्या पाण्याची पातळी ५० ते ६० मीटरने वाढू शकते. संयुक्त राष्ट्रांच्या संशोधकांच्या अंदाजानुसार २१ शतकाच्या अंतापर्यंत सागरी पाण्याची पातळी २० ते ११० सेंटिमीटरने वाढू शकते. हे रोखण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन रोखले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com