आर्मेनिया-अझरबैजानमध्ये संघर्षाचा भडका; रशिया-तुर्कीच्या उडीने युद्ध पेटणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

आर्मेनिया- अझरबैजान संघर्षात आतापर्यंत 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा आणि शेकडो लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. हा संघर्ष वाढत असतानाच आता यामध्ये इतर देशही सहभागी होण्याची शक्यता आहे.

येरेवान - आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये नागोरनो - काराबाख भागावरून संघर्ष पेटला आहे. रविवारपासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून सीमेवर तोफगोळे डागले जात आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरने हल्ले केल्याचा आऱोपही एकमेकांवर केला जात आहे. दरम्यान, आर्मेनिया- अझरबैजान संघर्षात आतापर्यंत 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा आणि शेकडो लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. हा संघर्ष वाढत असतानाच आता यामध्ये इतर देशही सहभागी होण्याची शक्यता आहे. रशिया आणि तुर्कस्तान यांनी उडी घेतल्यास युद्धाचे सावट निर्माण झाले आहे.

अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, आर्मेनियाच्या सुरक्षा दलांनी सोमवारी टारटार शहरावर गोळीबार सुरू केला. तर आर्मेनियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, युद्ध रात्रभर सुरु होतं आणि अझरबैजानने सकाळच्यावेळी हल्ले सुरु केले. दोन्हीकडून टँक, तोफ, ड्रोन आणि फायटर जेटमधून हल्ला करण्यात येत आहेत. 

अझरबैजानने तर असाही दावा केला आहे की, आर्मेनियाचे शेकडो सैनिक या लढाईत मारले गेले आहेत. मात्र आर्मेनियाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला. अझरबैजानच्या चार हेलिकॉप्टर्सना पाडल्याचा दावा आर्मेनियाकडून करण्यात आला. 

रशिया - तुर्कस्तान युद्धात उडी घेण्याची शक्यता

आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या लढाईत रशिया आणि तुर्कस्तान उडी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशिया आर्मेनियाचं समर्थन करत आहे तर अझरबैजानसोबत तुर्कस्तान आणि इस्राईल आहेत. न्यूयॉर्क  टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आर्मेनिया आणि रशियामध्ये करार असून जर अझरबैजानने केलेले हल्ले आर्मेनियाच्या जमिनीवर असतील तर रशिया त्यांना साथ देईल.  तर आर्मेनियानेसुद्धा आपल्या जमिनीवर हल्ले झाल्याचा दावा केला आहे. 

हे वाचा - अझरबैजान-अर्मेनियात युद्धस्थिती; कोठे आहेत देश आणि कशामुळे वाद?

अझरबैजानसोबत तुर्कस्तान असून या संकटातून शांततेनं मार्ग काढण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र अद्याप अझरबैजानकडून यासाठी कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे तुर्कस्तानने म्हटलं की, आर्मेनिया किंवा इतर कोणत्या देशाने कारवाई केल्यास अझरबैजानला मदत करू. तुर्कीच्या या वक्तव्याचा इशारा रशियाच्या दिशेने होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: armenia azerbaijan conflict russia turkey may come into war