जर्मनीतील ‘सीडीयू’ची सूत्रे लाशेट यांच्याकडे

Armin-Laschet
Armin-Laschet

बर्लिन - जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक पक्षाने (सीडीयू) आमिन लाशेट यांची पक्षाचे नवे नेते म्हणून निवड केली आहे. जर्मनीमध्ये सप्टेंबरमध्ये चॅन्सेलर पदासाठी निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली आहे. 

मर्केल या २००५ पासून जर्मनीच्या चॅन्सेलर पदावर आहेत. आपण या पुढील निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी २०१८ मध्येच जाहीर केले होते. ‘सीडीयू’चे अध्यक्षपदही त्यांनी सोडले होते. जर्मनीतील सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर ऱ्हाइन-वेस्टफॅलिया राज्याचे गव्हर्नर असलेले आमिन लाशेट हे मर्केल यांचे विश्‍वासू सहकारी आहेत. ‘सीडीयू’च्या नुकत्याच झालेल्या ऑनलाइन परिषदेत लाशेट यांनी, मर्केल यांचे एकेकाळचे विरोधक फ्रेडरिक मर्झ यांचा ५२१-४६६ अशा फरकाने पराभव केला. लाशेट यांना पक्षाचे प्रमुखपद मिळाले असले तरी तेच चॅन्सेलर पदासाठी पक्षातर्फे उमेदवार असतील असे नाही. मात्र, २६ सप्टेंबर २०२१ ला होणारी निवडणूक त्यांनी लढविली नाही तर, उमेदवार ठरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल. 

मर्केल यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ॲनग्रेट क्रॅम्प-कॅरनबोर यांच्याकडे सूत्रे आली होती. मात्र, फारसा प्रभाव पडत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सर्वांत शक्तीशाली पक्ष असलेल्या ‘सीडीयू’ला गेल्या अकरा महिन्यांपासून नेता नव्हता. 

यांचीही नावे चर्चेत
‘सीडीयू’ हा पक्ष ख्रिश्‍चन सोशल युनियन (सीएसयू) या पक्षाबरोबर सत्तेत एकत्र आहे. हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या उमेदवार ठरविणार आहेत. मर्केल यांनी कोरोना परिस्थितीची चांगली हाताळणी केल्याने जनमत या आघाडीच्याच बाजूने आहे. ‘सीएसयू’चे नेते मार्कस सोदर हेदेखील कोरोना काळात गाजल्याने ते चॅन्सेलरपदासाठी प्रमुख दावेदार मानले जातात. याशिवाय, आरोग्य मंत्री जेन्स स्पान यांचेही नाव चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com