
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत दोन प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.
Imran Khan : माजी पंतप्रधानांच्या अडचणी वाढल्या; इम्रान यांच्याविरूद्ध आणखी एक अटक वॉरंट जारी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. इम्रान यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयानं (Islamabad Sessions Court) आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय.
सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आलीये. याप्रकरणी इस्लामाबाद पोलिसांची टीम इस्लामाबादमधून लाहोरला पोहोचली आहे.
त्यामुळं इम्रान खान यांना पुढच्या 24 तासांत कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी माहिती पाकिस्तानी मीडियानं दिली आहे. इम्रान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी त्यांच्या हजारो समर्थकांनी लाहोरमध्ये मोर्चा काढला. याप्रसंगी खान यांच्या समर्थकांनी त्यांना दरबारात घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.

दरम्यान, खान यांच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आली. यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी आता थेट लाहोर गाठलं असल्याचंही पाकिस्तानी मीडियाकडून समजतं.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत दोन प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. यामध्ये तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्यानं आणि गेल्या वर्षी 20 ऑगस्ट 2022 रोजी एका जाहीर सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल खान यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. त्यामुळं इम्रान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असंही समजते.