काश्‍मीरप्रश्न सोडविण्यासाठी राजीव, बेनझीर तयार होते : झरदारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पाकचे माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्या वेळी काश्‍मीरबाबत एक योजना तयार केली होती. मात्र, तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला सहमती दिली नाही. बेनझीर यांनी राजीव गांधी यांच्याशी 1990 मध्ये काश्‍मीरच्या समस्येवर चर्चा केली होती. हा प्रश्न शांततेत सोडविण्यास दोन्ही नेते तयार झाले होते

लाहोर - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व बेनझीर भुट्टो यांची काश्‍मीरप्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याची तयारी होती. मात्र, राजीव गांधी यांची त्या वेळी हत्या झाली, असा दावा पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केला आहे.
येथे आयोजित काश्‍मीर रॅलीप्रसंगी ते बोलत होते.

झरदारी म्हणाले, ""पाकचे माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्या वेळी काश्‍मीरबाबत एक योजना तयार केली होती. मात्र, तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला सहमती दिली नाही. बेनझीर यांनी राजीव गांधी यांच्याशी 1990 मध्ये काश्‍मीरच्या समस्येवर चर्चा केली होती. हा प्रश्न शांततेत सोडविण्यास दोन्ही नेते तयार झाले होते. आपण सत्तेत येताच याबाबत पाकिस्तानशी चर्चा करू, असे राजीव त्या वेळी म्हणाले होते. मात्र, 1991 मध्ये त्यांची हत्या झाली.''

माजी पंतप्रधान नवाज शरीफ नरेंद्र मोदींचे मित्र असूनही याविषयी काहीही बोलत नाहीत. पाकिस्तान पीपल्स पक्षाशिवाय (पीपीपी) अन्य कोणतेही सरकार काश्‍मीर समस्येबाबत पुढाकार घेणार नाही. बेनझीर यांच्यानंतर "पीपीपी' सरकारने 2008-13 दरम्यान हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते, असेही झरदारी यांनी नमूद केले.

Web Title: asif ali zardari rajiv gandhi pakistan kashmir