चिनी दूतावासावरील हल्ल्याचा कट उधळला

चिनी दूतावासावरील हल्ल्याचा कट उधळला

कराची : पाकिस्तानातील कराची शहरातील आलिशान क्‍लिफ्टन परिसरामध्ये असलेल्या चिनी दूतावासावर आज सकाळी तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा दलांनी या तीनही हल्लेखोर दहशतवाद्यांना ठार मारले. या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारीदेखील मरण पावल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोर दहशतवाद्यांनी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांना ठार मारण्यात आल्याचे कराचीचे पोलिसप्रमुख आमीर शेख यांनी सांगितले. 

या हल्लेखोर दहशतवाद्यांच्या ताब्यातून नऊ हॅंडग्रेनेड, काडतुसे, मॅगझीन्स आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीमध्ये एक चिनी सुरक्षा रक्षक देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांनी सुरवातीला दुतावासाबाहेर त्यांची वाहने उभी केली, त्यानंतर त्यांनी तपासनाक्‍यावर हल्ला करत त्याच्या दिशेने हॅंडग्रेनेड भिरकावली, यानंतर काहीक्षणांमध्ये गोळीबार सुरू झाला. या चकमकीमध्ये एक पोलिस कर्मचारी ठार झाल्यानंतर हे दहशतवादी दूतावासाच्या मुख्य द्वाराच्या दिशेने जाऊ लागले; पण अन्य जवानांनी प्रसंगावधान राखत त्यांना तेथेच टिपले असे पोलिसांनी सांगितले. या दूतावासातील सर्व चिनी कर्मचारी सुरक्षित असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महंमद कुरेशी यांनी सांगितले. 

उच्चभ्रूंचा परिसर 

दरम्यान, कराचीतील क्‍लिफ्टन परिसरातील ई-स्ट्रीट हा उच्चभ्रूंचा परिसर म्हणून ओळखला जातो. कारण, याच परिसरामध्ये राजनैतिक अधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेस्टॉरंट्‌स आणि बड्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यामुळेच या भागामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांचे निवासस्थानदेखील याच भागात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com