
PM Modi : ऑस्ट्रेलियात तिथल्या नेत्यांपेक्षा मोदी जास्त फेमस? विरोधी पक्षनेत्याचा दावा
ऑस्ट्रेलियाचे विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केलं आहे. "मोदींच्या दौऱ्यावेळी जमा झालेली गर्दी पाहून आमचे नेते त्यांच्यावर जळत आहेत. आमच्या सत्ताधारी नेत्यांपैकी कोणीही दुसऱ्या देशात २० हजार लोकांनाही एकत्र आणू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना मोदींचा हेवा वाटतो." असं पीटर म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचे विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केलं आहे. "मोदींच्या दौऱ्यावेळी जमा झालेली गर्दी पाहून आमचे नेते त्यांच्यावर जळत आहेत. आमच्या सत्ताधारी नेत्यांपैकी कोणीही दुसऱ्या देशात २० हजार लोकांनाही एकत्र आणू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना मोदींचा हेवा वाटतो." असं पीटर म्हणाले.
पीटर ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी देशातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.
मोदींवर उधळली स्तुतीसुमने
पीटर यांनी यावेळी मोदींच्या दौऱ्याचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी २३ मे रोजी सिडनीमध्ये २० हजारांहून अधिक लोकांना संबोधित केले होते. याबाबत बोलताना पीटर म्हणाले, "या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बरेच नेते उपस्थित होते. मी पंतप्रधान अँथनी यांना म्हटलं, की जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन २० हजार लोकांना एकत्र आणण्याची मोदींची क्षमता पाहून सत्ताधारी नेते त्यांच्यावर जळत होते."
मोदी-मोदी नारे
पंतप्रधान मोदींनी केवळ हे लोक एकत्र नाहीत आणले, तर या लोकांनी त्यांच्या नावाचे नारे देखील दिले. ही घटना खरंच अनन्यसाधारण होती, असंही पीटर म्हणाले. "पंतप्रधान मोदींचे भारतीय समुदायाने केलेले स्वागत खरंच कौतुकास्पद आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी असलेल्या नात्याला सन्मान देत ऑस्ट्रेलियाचा दौरा केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आभार मानतो." असंही ते म्हणाले.
भारत-ऑस्ट्रेलिया संबंध
जेव्हा आमचे सरकार सत्तेत होते, तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध अगदी मजबूत होते. माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारमधील नेत्यांनी भारतासोबत व्यापार आणि अन्य क्षेत्रांमध्ये चांगले काम केले होते, असं मत पीटर यांनी व्यक्त केलं. गुरुवारी आपण पंतप्रधान मोदींना भेटलो, आणि द्विपक्षीय बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर आमचे एकमत असल्याचे संकेत त्यांनी दिले.