पाकमध्ये दहशतवाद्यांना खुलेआम फिरायला मुभा- भुट्टो कन्या

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

या आठवड्यात पाकिस्तानच्या सिनेटने 1981 मधील या कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात कुणी खुलेपणाने खाल्ले अथवा धूम्रपान केले तर तुरुंगवासाबरोबरच 500 रुपये दंडाची तरतूद केली आहे.

कराची : "माझ्या देशात दहशतवाद्यांना खुलेआम फिरण्यास परवानगी आहे; पण रमजानच्या वेळी काही खाल्ले तर तुरुंगात डांबले जाते," असे सांगून पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टो- झरदारी हिने पाकिस्तानमधील दांभिकतेवर शुक्रवारी कडाडून टीका केली.

बेनझीर यांच्या तीन अपत्यांपैकी एक बख्तावर आहे. तिने काल ट्‌विटरवर पाकिस्तानच्या ढोंगीपणावर हल्ला चढविला. पाकिस्तानमध्ये "एहत्राम- ई- रमजान' कायदा लागू आहे. रमजानचा उपवास मोडून कोणी खाताना दिसले, तर त्याला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. झिया उल हक हे पाकिस्तानचे अध्यक्ष असताना हा कायदा अमलात आला आहे.

या आठवड्यात पाकिस्तानच्या सिनेटने 1981 मधील या कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात कुणी खुलेपणाने खाल्ले अथवा धूम्रपान केले तर तुरुंगवासाबरोबरच 500 रुपये दंडाची तरतूद केली आहे. ज्या हॉटेलमध्ये रमजानचे नियम पाळण्यात येत नसतील, तर 500 पासून 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नियम मोडणाऱ्या वृत्तवाहिन्या व चित्रपटगृहांना पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर बख्तावर यांनी हा कायदा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. "दहशतवादी आहे म्हणून, तसेच मलालासारख्या शालेय मुलीला मारण्याचा प्रयत्न केला तर कोणाला शिक्षा होत नाही किंवा कारावासात ठेवले जात नाही; पण रमजानच्या काळात पाणी प्यायले तर मात्र एखाद्याला तुरुंगात पाठविले जाते. प्रत्येक माणूस हा कायदा पाळू शकत नाही. याचे पालन करताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे,'' असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

बख्तावरच्या या ट्विटला उत्तर देताना कोणीतरी म्हटले आहे, की उपवास करणे हे इस्लामी कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यावर "उपवास करणे हे बंधनकारक असले तरी, उपवास नाही केला तर अटक करा, असे कायद्यात कोठे म्हटलेले नाही,'' असे स्मरण तिने त्या व्यक्तीला करून दिले. तसेच, 'हा इस्लाम नाही,' अशी टिप्पणीही केली.

रमजानच्या उपवासाबाबत इस्लाममध्ये काही नियम आहेत. ज्या रुग्ण व्यक्ती व प्रवाशांना उपवास करणे शक्‍य नाही, त्यांनी ते तूर्त करू नयेत. तसेच, नाजूक प्रकृतीचे लोक, वयोवृद्ध व उपवासामुळे आजारी पडू शकतात किंवा अगदी मरण पावण्याच्या स्थितीत असतात, त्यांनी उपवासापासून दूर राहावे, असे कुरआनमध्ये नमूद केलेले आहे.
- ताहीर अर्शफी, ज्येष्ठ धर्मगुरू

Web Title: bakhtwar bhutto slams pak over ramzan law