प्रिय ट्रम्प, सीरियातील लहान मुलांची कृपया काळजी घ्या

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

इस्तंबूल - "सीरियामधील लहान मुले हीदेखील तुमच्या लहान मुलांसारखीच आहेत; आणि तुमच्याप्रमाणेच त्यांनाही शांततेत जगण्याचा अधिकार आहे,' असे बना अलाबेद या सात वर्षीय मुलीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

इस्तंबूल - "सीरियामधील लहान मुले हीदेखील तुमच्या लहान मुलांसारखीच आहेत; आणि तुमच्याप्रमाणेच त्यांनाही शांततेत जगण्याचा अधिकार आहे,' असे बना अलाबेद या सात वर्षीय मुलीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

बना व तिच्या कुटूंबीयांनी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये अलेप्पो येथून पलायन केले असून सध्या ते तुर्कस्तानमध्ये राहत आहेत. अलेप्पो शहरामधून या काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. सीरियामधील लहान मुलांसाठी काही तरी करा, असे आवाहन तिने ट्रम्प यांना केले आहे. फतेमाह या बनाच्या आईद्वारे तिचे ट्‌विट अकाउंट चालविले जाते.

बनाने ट्रम्प यांच्या शपथविधीआधी दोन दिवस हे पत्र लिहिले आहे. "ट्रम्प यांना याआधी टीव्हीवर अनेकदा पाहिले असल्याने,' तिने हे पत्र लिहिल्याचे फातेमाह यांनी म्हटले आहे.

बनाने​ लिहिलेल्या पत्राचा आशय असा -

प्रिय डोनाल्ड ट्रम्प,
माझे नाव बना अलाबेद असे असून मी अलेप्पो येथे राहणारी सात वर्षीय सीरियन मुलगी आहे.
आत्तापर्यंतचे माझे पूर्ण आयुष्य मी सीरियामध्येच काढले आहे. परंतु गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये पूर्व अलेप्पोस पडलेल्या वेढ्यानंतर मी सीरियामधून स्थलांतर केले. सीरियामधील युद्धामुळे अत्याचार सहन करावा लागलेल्या सीरियन मुलांपैकीच मीसुद्धा एक आहे
मात्र आता, तुर्कस्तानमधील माझ्या नव्या घरामध्ये मला शांतता लाभली आहे. अलेप्पोमध्ये मी शाळेमध्ये जात होते. मात्र आमच्या शाळेवर बॉंब पडल्याने ती उध्वस्त झाली.
माझे काही मित्र मैत्रिणी या हल्ल्यात मृत्युमुखी पडले.
या घटनेमुळे मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते जर आत्ता माझ्याबरोबर येथे असते; तर आम्ही एकत्र खेळू शकलो असतो. मी अलेप्पोमध्ये खेळू शकले नाही. कारण ते शहर हे मृत्युचे शहर होते.
परंतु आता तुर्कस्तानमध्ये मी खेळू शकते व आनंद लुटू शकते. मी शाळेतही जाऊ शकते. मात्र अद्यापी मी येथील शाळेत गेलेले नाही. म्हणूनच तुमच्यासहच प्रत्येकाच्या आयुष्यात शांतता असणे अत्यंत आवश्‍यक आहे.
मात्र सीरियामधील लक्षावधी लहान मुले ही अजूनही देशाच्या विविध भागांत अडकलेली आहेत. या लहान मुलांवर मोठ्या माणसांमुळे अत्याचार होत आहेत.
तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहात, याची मला कल्पना आहे. तेव्हा तुम्ही कृपया सीरियातील नागरिक व लहान मुलांना वाचवाल का? सीरियामधील लहान मुलांसाठी तुम्ही काही तरी करावयास हवे. कारण तीदेखील तुमच्या लहान मुलांप्रमाणेच आहेत; व त्यांनाही शांततेत आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.
सीरियामधील लहान मुलांना तुम्ही मदत करण्याचे आश्‍वासन देत असाल; तर माझी तुमच्याशी मैत्री झालीच, असे समजा!
सीरियामधील लहान मुलांसाठी तुम्ही काय करता, यासंदर्भात मला उत्सुकता लागून राहिली आहे.

बना व तिच्या कुटूंबीयांनी सीरियन राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांच्याविरोधात लढणाऱ्या बंडखोरांना पाठिंबा दर्शविला आहे. सीरियन प्रश्‍नासंदर्भात ट्रम्प यांचे धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर, या लहान मुलीने लिहिलेल्या पत्रास ट्रम्प काय प्रतिसाद देतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Bana Alabed: Syrian girl pens letter to Trump