निवृत्तीनंतरही ओबामांवर धनवर्षाव कायम राहणार

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

व्याख्याने, लेखनातून मिळणार कोट्यवधी डॉलर

व्याख्याने, लेखनातून मिळणार कोट्यवधी डॉलर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा निवृत्तीनंतरचा काळदेखील त्यांच्यावर अनेक मार्गांनी धनवर्षाव करणारा ठरणार आहे. व्याख्याने, अध्यापन, लेखन, मंडळाचे सदस्य आणि एका व्यावसायिक बास्केटबॉल संघाचे मालक म्हणून ते कोट्यवधी डॉलर कमावू शकतात. ओबामांना केवळ पुस्तके लिहून तीनशे कोटी रुपयांची कमाई करता येणार असून, त्यांना निवृत्तिवेतनापोटी तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये मिळणार आहेत. सध्याची महागाई लक्षात घेता यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ओबामा यांनी 2009 मध्ये केवळ पुस्तकांच्या लिखाणातून 31 कोटी रुपये कमावले असल्याने ते आता पूर्णवेळ लेखक होण्याचीच शक्‍यता अधिक आहे. मागील वर्षी ओबामा यांची संपत्ती तब्बल 12.1 दशलक्ष डॉलर म्हणजे 77 कोटी रुपये एवढी होती.

वक्‍तृत्वाची किमया
अमेरिकी युनिव्हर्सिटीतील "सेंटर फॉर कॉंग्रेसशनल अँड प्रेसेडेन्शियल स्टडीज'चे संचालक जेम्स थर्बर यांच्या माहितीनुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष भाषणाच्या माध्यमातून चांगली कमाई करत असतात. माजी अध्यक्षांना एका भाषणासाठी तब्बल 2.5 लाख डॉलर एवढे मानधन मिळते. ओबामा यांचे वक्‍तृत्व चांगले असल्याने ते व्याख्यानाचा मार्ग स्वीकारू शकतात.

लेखक, प्राध्यापक
ओबामा हे अमेरिकेत लेखक म्हणूनदेखील कमालीचे लोकप्रिय आहेत, "दि ऑडेसिटी ऑफ होप', "ड्रीम्स फ्रॉम माय फादर' या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी 31 कोटी रुपये कमावले आहेत. शिवाय ओबामा यांचा पिंड लेखक आणि विचारवंताचा असल्याने ते लेखनाकडेच वळतील, असे बोलले जाते. ओबामांनी याआधी "शिकागो लॉ युनिव्हर्सिटी'मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. शिकागोमध्ये त्यांचे घरसुद्धा आहे. बिल क्‍लिंटन यांच्याप्रमाणे ओबामा स्वत:चे फाउंडेशनदेखील सुरू करू शकतात. जगातील कोणताही मोठा उद्योग समूह आपल्या कार्पोरेट मंडळामध्ये ओबामा यांना सामावून घेऊ शकतो. या माध्यमातूनदेखील त्यांना पैसे कमावता येऊ शकतात.

Web Title: Barack Obama after retirement gain money