पाकिस्तानने आता परिणामांस सज्ज रहावे: पाक माध्यमे

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

जाधव यांना पाकिस्तानी कायद्याप्रमाणे कडक शासन करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाचे राजकीय व राजनैतिक परिणाम पाकिस्तान सहन करु शकेल अथवा नाही, हे पहावे लागेल

इस्लामाबाद - भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याची घोषणा पाकिस्तानने केल्यानंतर या घटनेचे जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय "दुर्मिळ' असल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानी माध्यमांनी या निर्णयाच्या राजनैतिक परिणामांना सामोरे जाण्याची आता पाक सरकारने ठेवावी, असा इशारा दिला आहे.

पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरीच्या आरोपांतर्गत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे; मात्र त्याचवेळी सावधगिरीचा इशाराही दिला आहे.

दी नेशन या पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण वर्तमानपत्राने "भारतीय हेरास फाशी देण्याच्या निर्णयामुळे भारत व पाकिस्तान या अण्वस्त्रसज्ज देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्‍यता' असल्याचे मत व्यक्त केले आहे. "जाधव यांना पाकिस्तानी कायद्याप्रमाणे कडक शासन करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाचे राजकीय व राजनैतिक परिणाम पाकिस्तान सहन करु शकेल अथवा नाही, हे पहावे लागेल,' असे डॉ. हसन असकारी या संरक्षण तज्ज्ञाचे मत दी नेशनने प्रसिद्ध केले आहे. दी नेशन हे वर्तमानपत्र भारतविरोधासाठी प्रसिद्ध आहे.

दी एक्‍सप्रेस ट्रिब्यून या अन्य एका महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रानेही अशाच स्वरुपाच्या भूमिकेचा आश्रय घेतल्याचे आढळून आले आहे. डॉन या पाकिस्तानमधील अत्यंत प्रभावी वर्तमानपत्राने पाकमधील तज्ज्ञांची जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयासंदर्भातील निवडक मते प्रसिद्ध केली आहेत. यांमधील काही जणांनी भारताची यासंदर्भातील प्रतिक्रिया कडक असेल, असे म्हटले आहे; तर काही जणांनी जाधव यांच्या फाशीमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये कोणताही निर्णायक बदल घडणार नाही, असे मत मांडले आहे.

एकंदर, यासंदर्भात पाकिस्तानने सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा येथील माध्यमांमधून व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Be ready to face fallout of Kulbhushan Jadhav's sentence: Pak Media