भारतीय ड्रोनकडून चिनी हवाई हद्दीचा भंग

भारतीय ड्रोनकडून चिनी हवाई हद्दीचा भंग

बीजिंग: भारताचे एक ड्रोन (मानवरहित विमान) काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे आमच्या हवाई हद्दीत घुसले आणि सिक्कीम भागात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा चीनने आज येथे केला. या घटनेनंतर देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा भंग केल्याबद्दल भारताकडे राजनैतिक विरोध नोंदवावा लागल्याचेही चीनने नमूद केले.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की भारताचे मानवरहित विमान चीनच्या सीमेजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. चिनी लष्कराचे अधिकारी झांग शुइली यांनी याबाबतची माहिती दिली. चीनच्या सीमा दलांनी ड्रोनची ओळख पटवली आणि त्याची सत्यता सिद्ध केली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सांगितले, की चीनने आपल्या सार्वभौमत्वाचा भंग करणाऱ्या ड्रोनवरून भारतासमोर राजनैतिक विरोध नोंदविला आहे. हे ड्रोन सिक्कीम सेक्‍टरमध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. डोकलाम हे भारत-चीन सीमेच्या सिक्कीम सेक्‍टरमध्ये येते.

तांत्रिक दोषामुळे भंग : भारत
सिक्कीम सेक्‍टरमध्ये भारताचे एक ड्रोन नियमित प्रशिक्षण अभियानावर होते. त्याच वेळी त्याचा संपर्क तुटला आणि तांत्रिक दोषामुळे ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेल्याचा खुलासा भारतीय संरक्षण मंत्रालयातर्फे करण्यात आला आहे. रक्षा मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की घटनेनंतर भारतीय जवानांनी ड्रोनची स्थिती स्पष्ट व्हावी, यासाठी सीमेवर तैनात चीनच्या सैनिकांना याबाबतची तत्काळ माहिती दिली होती. दरम्यान, पूर्ण शिष्टाचारांतर्गत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com