दोन महायुद्धे, ऑटोमन साम्राज्याचा साक्षीदार बनलेल्या महालाची काही सेकंदात दुरावस्था

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

देशात १९७५ ते १९९० या दरम्यान झालेली अंतर्गत संघर्ष संपल्यानंतर या महालाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यास महालाच्या मालकाला वीस वर्षे लागली.

बैरुत - बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात जवळपास 200 नागरिकांचा मृत्यू झाला असून 6 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिवित हानीसह मोठ्या प्रमाणावर या स्फोटात वित्त हानी झाली आहे. यात सुरसॉक महालाचाही समावेश आहे. देशातील यादवी संघर्ष थांबल्यानंतर महालाचे गतवैभव प्राप्त करून देण्यास 20 वर्षे आणि बराच पैसा खर्च करण्यात आला. मात्र एका स्फोटाने हे सर्व वैभव नष्ट झालं आहे. 

लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये गेल्या शतकात बांधलेला सुरसोक महाल दोन्ही महायुद्धांत टिकला, ऑटोमन साम्राज्य संपुष्टात आले तरीही तो उभा होता आणि लेबनॉनच्या स्वातंत्र्य क्रांतीतही त्याला हानी पोचली नाही.

Image

देशात १९७५ ते १९९० या दरम्यान झालेली अंतर्गत यादवी संपल्यानंतर या महालाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यास महालाच्या मालकाला वीस वर्षे लागली. मात्र, गेल्या आठवड्यात बैरुतला रसायनांच्या झालेल्या प्रचंड स्फोटांमुळे काही सेकंदातच हा महालाची पार रया गेली. 

हे वाचा - रक्ताळलेले कपडे आणि त्यात गुंडाळलेला चिमुकला जीव; बैरूत स्फोटानंतरचा फोटो प्रचंड व्हायरल

1860 मध्ये बांधलेल्या या महालाची मालकी सध्या रॉड्रिक सुरसोक यांच्याकडे आहे. तीन मजली उंच असलेला हा महाल बैरुतची शान मानला जातो. रसायनांच्या स्फोटात या महालाच्या सर्व काचा तर फुटल्याच, शिवाय  काही ठिकाणी छत कोसळले, कठडे तुटले, किमती छायाचित्रांना आणि भिंतींना तडे गेले. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले. वरच्या मजल्याचे छत तर पूर्णपणे पडले.

Image

१५ वर्षांतील अंतर्गत संघर्षात महालाची जितकी हानी झाली नाही, त्याहून दहापट हानी काही सेकंदांमध्येच झाली, असे सुरसोक यांनी सांगितले. महालाचे इतके नुकसान झाले आहे की, तो पूर्ववत करणे ही एक दीर्घकाळाची आणि अत्यंत खर्चिक प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले. सरकारकडून फारशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाही. हा देश गुंडांची टोळी चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

हे वाचा - लंकेत वडील-मुलगा आणि 3 भावांच्या हाती सत्ता; एक राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान

बैरूतमधील एका पर्वतावर बांधण्यात आलेला सुरसॉक महाल हा सुरसॉक कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी जपलेला ऐतिहासिक वारसा होता. या महालात अत्यंत कलात्मक वस्तू ऑटोमन काळातील फर्निचर, अत्यंत दुर्मिळ चित्रे यांचा खजिनाच आहे. येथे विवाह सोहळा होणे, समारंभ करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.

Image

विदेशी पर्यटकही हा महाल आवर्जून पाहतात. या महालाला सांस्कृतिक वारशाचा दर्जाही मिळाला आहे. सुरसॉक फॅमिली मूळची कान्स्टिटिनोपाल इथली आहे. आता त्या ठिकाणाला इस्तांबुल या नावाने ओळखलं जातं. सुरसॉक कुटुंबिय 1714 मध्ये बैरूतमध्ये स्थायिक झालं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beirut sursock palace destroy after blast see photos