पुतिन यांना झटका; रशियावर बंदी घालण्याचा यूरोपीय महासंघाचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त निवेदनात रशियावर टीका केली

ब्रुसेल्स- राजकीय विरोधक अॅलेक्नी नवाल्नी यांच्या विषबाधेबद्दल दोषी धरण्यात आलेले रशियन अधिकारी आणि संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे. याबाबतचा तपशील मात्र अद्याप देण्यात आला नाही. महासंघातील सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक लक्झेम्बर्गमध्ये झाली. त्यात फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी भागीदार देशांना आवाहन केले. रासायनिक अस्त्रांचा वापर आणि प्रसार यांच्याविरोधातील निर्बंधांनुसार संशयित अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठवावी तसेच त्यांना युरोपमध्ये प्रवास करण्यास बंदी घालावी, असे सांगण्यात आले.

महासंघाचे परराष्ट्र धोरणविषयक प्रमुख जोसेप बॉरेल यांनी सांगितले की, या प्रस्तावाचा सर्व सदस्य देशांनी संपूर्णपणे स्वीकार केला. आता कार्यवाही करण्याच्यादृष्टिने तांत्रिक तरतुदी तयार केल्या जातील. रशियन अधिकाऱ्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्या कर्तव्याच्या अधिकृत स्वरूपाचा आढावा घेण्यात येईल. त्यातून आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई होईल.

चीनला मिरच्या झोंबल्या; लडखला केंद्रशासित प्रदेश मानण्यास नकार

संयुक्त निवेदनात टीका

फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त निवेदनात रशियावर टीका केली. नवाल्नी यांची प्रकृती अचानक खालावण्याबाबत वारंवार आवाहन करूनही रशियाने कोणतेही विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही. यात रशियाचा हात असणे व याची जबाबदारी रशियाचीच असणे याशिवाय नवाल्नी यांच्यावरील विषबाधेचे कोणतेही तर्कसंगत स्पष्टीकरण असू शकत नाही, असे ठामपणे सांगण्यात आले.

रासायनिक अस्त्र प्रतिबंध संघटनेचे निर्णय पाहता याबाबतच्या ठरावांचा भंग झाल्याचे उघड आहे. त्यामुळे याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हैको मास म्हणाले आहेत.

नवाल्नी विषबाधाप्रकरणी कोणत्याही चौकशीस संपूर्ण सहकार्य करण्यास रशियाचे मन वळविणे महत्त्वाचे आहे. नोव्हीचोक सारखे घातक रसायन तयार करणे आणि रशियन भूमीत त्याचा वापर होणे नियमबाह्य आहे, असं फिनलंडचे परराष्ट्र मंत्री पेक्का हावीस्तो म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big blow to Vladimir Putin Europe union ban Russia