बंगळुरात भाजप नगरसेवकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

'मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने भोसकून श्रीनिवास प्रसाद यांची हत्या केली.

बंगळूर- बंगळूरमधील भाजप नगरसेवक व दलित नेते श्रीनिवास प्रसाद यांची बंगळूर ग्रामीणमधील अनेकल येथे आज (मंगळवार) सकाळी अज्ञात व्यक्तीने हत्या केली.

'मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने भोसकून श्रीनिवास प्रसाद यांची हत्या केली. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे बंगळूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विनीत सिंग यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटकातील माध्यम समन्वयक राजेश पदमार यांनी सांगितले की, 'श्रीनिवास प्रसाद चांगली व्यक्ती होती. त्यांच्यावर कोणताही फैजदारी खटला नव्हता. या घटनेची तत्काळ आणि निःपक्षपाती चौकशी करण्यात यावी; तसेच राज्य सरकारने अशा घटना थांबवण्यासाठी लवकरात लवकर कठोर निर्णय घ्यावा.'

बंगळूरमध्ये मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याचा निषेध करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित असलेल्या दहापेक्षा जास्त कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे.

 

Web Title: BJP Councillor killed Near Bengaluru